निरामया

निरामया

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

डॉ. सरला निकम एक नावाजलेल्या हृदय शल्यविशारद. ख्यातनाम असलेल्या डॉ. सरला ह्यांचे वैशिष्टय म्हणजे, गेल्या वीस वर्षात आजपर्यंत एकही शस्त्रक्रिया त्यांच्या हातून अयशस्वी ठरली नव्हती. अशीच एक क्लिष्ट शस्त्रक्रिया आटोपून त्या विश्रांती घेत घरी बसल्या असताना, दारावर कुणीतरी बेल वाजवली. खरं तर, यावेळी त्या कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. तरी देखील त्यांनी मोठ्या कष्टाने दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या मुलीला बघितलं आणि त्यांनी तिला स्मितहास्य करत आत येण्याची खूण केली.

चोवीस वर्षाची निरामया समोर खूर्चीत येऊन बसली. मागोमाग तिचे वडील देखील आत आले. थोडे विमनस्क, थोडे चिंताग्रस्त..... दोन मिनिटे कुणालाच काय बोलावे ते कळेना. सुरुवात निरामयानेच केली. "डॉक्टर, माझ्या बाबतीत तुमचा काय निर्णय आहे? "हे बघ बाळा, तुझ्या बाबांशी ह्या बाबत मी सविस्तर बोलले आहे..."मला कळलंय ते सगळं डॉक्टर…. बाबा जरी सांगायला घाबरत असले, तरी मी सर्व रिपोर्ट्स वाचले आहेत... माझ्या हृदयाच्या चारही झडपा निकामी झाल्या आहेत आणि मी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकेन…….खरंय ना?""कुठपर्यंत शिक्षण झालं आहे तुझं?" विषय टाळण्यासाठी डॉक्टरांनी विचारले. "M.Sc. फायनलला आहे ती. नुकतीच परीक्षा आटोपली. आतापर्यंत तिला ९५ टक्क्याहून कमी मार्क्स कधीच पडले नाहीत” तिचे बाबा बोलले. "आताही मी उत्तम मार्काने पास होऊन M Sc होणार ह्याची मला खात्री आहे. मला शिकून खूप मोठं व्हायचंय डॉक्टर....” निरामया म्हणाली डॉ. सरलाना काय बोलावे ते कळेना. कारण अतिशय क्लिष्ट अशी तिची शस्त्रक्रिया ठरणार होती. जराशीही चूक तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती आणि ती जोखीम पत्करण्याची त्यांच्या मनाची अजिबात तयारी नव्हती. जिवात जीव आहे, तोपर्यंत तरी तिने सुखाने जगावे, असे त्यांना मनोमन वाटत होते.

"डॉक्टर, तुम्ही पैशाची काळजी करू नका. मी काय वाट्टेल ते करीन आणि लागेल तेवढा पैसा उभा करेन. पण माझ्या लेकीला वाचवा हो..." तिचे बाबा डोळ्यात पाणी आणून विनवण्या करू लागले. "काका, प्रश्न फक्त पैशाचाच नाही आहे हो.....मी तुमच्याशी ह्या बाबत बोलले होते ना की …….."हेच ना, की ऑपरेशन फार गुंतागुंतीचे आहे? जराशीही चूक माझ्या जीवावर बेतू शकते" त्यांचे वाक्य संपण्याआधीच निरामया बोलली.डॉक्टर स्तब्धपणे बघू लागल्या…..काय बोलावे तेच त्यांना कळेना. "तुम्ही तर एक नामांकित डॉक्टर आहात. आतापर्यंत कितीतरी शस्त्रक्रिया तुम्ही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे डॉक्टर. अहो, मी रुग्ण असून देखील जर खंबीर आहे, तर मग तुम्हाला घाबरण्याचे कारण काय? हे बघा डॉक्टर, पुढचे सहा महिने जरी जिवंत राहिले तरी मी तिळ तिळ मरणारच आहे. आणि मला तसले जगणे नको आणि मरणही नको आहे. जे काही होईल ते होऊन जाऊ द्या, मरायचेच असेल तर सहा महिन्यांनी मरण्यापेक्षा मी ऑपरेशन टेबलवरच मरण पत्करेन. पण तुम्ही माझे ऑपरेशन करावे ही हात जोडून प्रार्थना करते " डोळ्यात पाणी आणून निरामया विनवण्या करू लागली. तिचे बाबा आपला हुंदका दाबण्याचा प्रयत्न करत होते.निरामयाचा आत्मविश्वास आणि जगण्याची जिद्द बघून डॉक्टर अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी उठून तिच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाल्या, "ठीक आहे बेटा, मी तुझं हे आव्हान स्विकारते…. माझं सारं कौशल्य मी पणाला लावेन”

निरामयाच्या बाबांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे परंतू पोरीच्या प्रेमापोटी ते बोलत आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्याकडे वळून त्या म्हणाल्या, “काका, तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. काही स्वयंसेवी संस्था माझ्या ओळखीच्या आहेत. तिथून आवश्यक तेवढया पैशाची मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन."ताबडतोब तिला दवाखान्यात दाखल करून घेतले गेले. डॉक्टरांच्या मदतीने पैशाची सोय होण्यात विशेष अडचण आली नाही. आवश्यक त्या चाचण्या पूर्ण झाल्या. डॉ. सरलांनी त्यासाठी त्यांच्या अमेरिकेतील डॉक्टर मित्रांना स्वखर्चाने बोलावून घेतले. इतरही काही निष्णात डॉक्टरांशी सल्ला मसलत केली. डॉ. सरलाचा निर्णय झाला होता, की जर ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली, तर त्या नेहमीसाठी आपल्या डॉक्टरी व्यवसायाचा त्याग करतील. शेवटी ऑपरेशनचा दिवस उजाडला. सकाळी आठची वेळ ठरली होती. निरामयाच्या तपासण्या पूर्ण होऊन साडेसात वाजता तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरवर घेण्यात आले.

तेवढ्यात तिच्या भावाने नर्सला विनंती केली, "प्लीज, थोडया वेळ थांबता येईल का? बाबा अजून यायचे आहेत...."जास्त उशीर करू नका… म्याडमना उशीर झालेला अजिबात आवडत नाही" नर्स म्हणाली"बस पाचच मिनिटं … येतीलच ते इतक्यात, ट्राफिकमध्ये अडकले आहेत… आत्ताच त्यांचा फोन आला होता...." तिचा भाऊ म्हणाला… निरामयाची नजर देखील सारखी दाराकडेच होती.

इतक्यात तिचे बाबा लगबगीने आत आले. त्यांना बघताच निरामया स्ट्रेचरवर उठून बसली आणि अक्षरश: बिलगलीच. दोघांच्याही डोळ्यातून आसवं वाहत होती. पुन्हा भेट होईल की नाही ह्याची शाश्वती नव्हती ना! वातावरण अतिशय गंभीर झाले होते. हृदय हेलावून टाकणारे ते दृश्य बघून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. शेवटी नर्सने तिच्या बाबांना अलगद बाजूला केले आणि म्हणाली, "काका, अशा वेळी पेशंटनी रडायचं नसतं. पेशंट जितका आनंदी असेल तितक्या लवकर तो बरा होतो. ती बरी व्हावी असं वाटतंय ना? मग तिला हसून निरोप द्या बघू.... देवावर विश्वास ठेवा तुमची मुलगी नक्की सुखरूप परत येईल "बाबांनी लगेच आपले डोळे पुसले आणि पोरीच्या डोक्यावरून हात फिरवून भरभरून आशीर्वाद दिले.

जवळपास आठ तासपर्यंत ऑपरेशन चालले. डॉक्टर सरला निकम ह्यांच्या आयुष्यातील हे सर्वात महत्वाचे जबरदस्त आव्हान होते. त्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक करून तयारी केली होती. ऑपरेशन नंतरचे अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे होते. तेवढा वेळ सुरळीत पार पडला तर निरामयाच्या आयुष्याचा धोका नेहमीसाठी टळणार होता. तो सबंध वेळ डॉक्टरांनी डोळ्यात तेल घालून तिच्या देखरेखीत घालवला. सुदैवाने तो क्षण आला, निरामया शुद्धीवर आली आणि तिच्या जीवावरचे विघ्न नेहमी साठी दूर झाले. ज्या सहा महिन्यात तिच्या जगण्याची खात्री नव्हती त्याच सहा महिन्यात ती अगदी ठणठणीत बरी झाली. पुढे आणखी शिकून ती केमिस्ट्रीची प्रोफेसर झाली. निरामयाला नवीन आयुष्य मिळाले आणि डॉ. सरला निकम ह्यांच्या कर्तृत्वात एक मानाचा तुरा खोवला गेला…!

=================================================

एका सत्यघटनेवर आधारित असलेली ही कथा आहे. ह्यात पात्रांची नावे, स्थळ आणि प्रसंगांमध्ये आवश्यक ते सकारात्मक बदल केले आहेत. पेशंट्स आणि डॉक्टर मंडळींना ह्यातून प्रेरणा मिळावी हाच त्यामागचा उद्देश आहे. कृपया प्रतिक्रिया द्याव्या ही विनंती!  - - प्रदीप मार्कंडेय ==================================================

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • अपेक्षा +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • पाऊस +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • निरामया +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • जीवेत शरद: शतम +

 • सिंहगड किल्ला +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • 1
 • 2