LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
मराठी चित्रपटः काल, आज आणि उद्या

मराठी चित्रपटः काल, आज आणि उद्या

मराठी सिनेसृष्टीचा इतिहास म्हंटला तर सर्वात आधी स्मरण होते ते दादासाहेब फाळके यांचे...अर्थात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असणारे दादासाहेब फाळके यांनी आपल्या कलात्मक बुध्दीकोषातून सादर केलेला "राजा हरिश्चंद्र" हा चित्रपट मुकपट जरी असला, तरी तो मराठी भाषिकच होता! त्यामुळे आपल्या देशात सिनेसृष्टीची सर्वप्रथम उभारणी ही मराठीतुनच झाली हे सत्य नाकारता येत नाही.

असो... ! अशा या मराठी चित्रपटाच्या लौकिकाला साजेसे अनेक चित्रपट आजतागायत होऊन गेले आहेत. सत्यजित राय पासून व्ही. शांताराम यांनी गाजवलेला काळ मराठी चित्रपट सृष्टीतला अनमोल ठेवा आहे. या मराठी चित्रपट संस्कृतीच्या लेण्यांमध्ये तात्कालिन दिग्दर्शक, लेखक, गायक आणि नेपथ्य कारांनी उत्तमोत्तम कलाकृती रेखाटल्या आहेत. या कलाकृतीत आता आधुनिकतेचा साज चढावण्याचे काम सध्याचे कलावंत करीत आहेत. शिवाय भविष्यात हि या लेण्यांमध्ये अनेक कलाकृती रेखाटल्या जातील यात शंका नाही. त्याचा घेतलेला हा आढावा ...

मराठी चित्रपटातील इतिहासात सावकारी पाश (१९३६) या चित्रपटाला अग्रस्थान आहे. हा मराठीतील पहिला वास्तववादी चित्रपट म्हणून गणला जातो. बाबूराव पेंटर दिग्दर्शित हा चित्रपट यापुर्वी १९२५ साली मूकपट म्हणून बनविला होता. विशेष म्हणजे खेडय़ातील तसेच शहरातील वातावरणाचे यथार्थ चित्रण यात केले गेले. या चित्रपटानंतर बोलपटाची ख-या अर्थाने सुरुवात झाली. सावकारी पाश चित्रपटात विष्णुपंत औंधकर यांनी सावकाराचे काम केले होते. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा लावणी प्रकार चित्रपटात आला. त्याकाळात बहुतांशी पौराणिक चित्रपटांचाच जमाना होता, त्यामुळे सावकारी पाश चित्रपट त्या चाकोरिबाहेरचा ठरला. पंडित नेहरू आणि सरोजिनी नायडू यांनीही या चित्रपटाचे वास्तववादी म्हणून वर्णन केले होते.

त्यानंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित पहिला सामाजिक बोलपट कुंकू १९३७ साली प्रदर्शित झाला. सावकारी पाश या चित्रपटाप्रमाणेच लेखक ना. ह. आपटे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात घडय़ाळाचा प्रतीकात्मक वापर करून सिनेमाची भाषा विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कृष्णधवल सिनेमाच्या त्या युगात समाजात खदखदत असलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीला आव्हान करण्याचे धाडस कुंकू चित्रपटामध्ये करण्यात आला. यात अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारलेली पहिली बंडखोर स्त्रीची भूमिका आजही अजरामर आहे. अशाप्रकारे पौराणिक कथेतून वास्तववादी कथांमध्ये दरमजल करणा-या मराठी चित्रपटांमध्ये नंतर अनेक पट येऊ लागले, यात १९३८ साली 'ब्रह्मचारी' या विनोदी पटाची भर पडली. आचार्य अत्रे लिखित आणि मास्टर विनायक दिग्दर्शित 'ब्रह्मचारी' हा पहिला मराठी विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. यांतील एका गाण्यात अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकरने बिकिनीमध्ये दृश्ये देऊन मोठे धाडस केले होते. यासाठीदेखील हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला. याच काळात एतिहासिक चित्रपटाचादेखील मोठा बोलबाला राहिला आहे.

भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित आणि ललिता पवार, मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका असलेला नेताजी पालकर (१९३९) हा चित्रपट पहिला ऐतिहासिक चित्रपट ठरला. ऐतिहासिक चित्रपटांचा प्रकार चित्रपटसृष्टीत सुस्थापित करणारा हा पहिला चित्रपट होय.

स्वातंत्रापुर्वीच्या चित्रपटांमध्ये संत ज्ञानेश्वर (१९४०) आणि रामशास्त्री (१९४४) या चित्रपटांचादेखील नामोल्लेख करावा लागेल. शिवराम वाशीकर यांचे कथा-पटकथा-संवाद असलेला आणि विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल यांचे दिग्दर्शन असलेला संत ज्ञानेश्वर हा चित्रपट संतपट धाटणीचा होता. या चित्रपटाची सर्व संतपटांमध्ये आदर्श संतपट म्हणून गणना झाली आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी तांत्रिक बाबींसाठी या चित्रपटाचा गौरव केला होता, असा गौरव केलेला तेव्हाचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. यात शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची प्रमुख भूमिका साकारली होती.

त्यानंतर रामशास्त्री (१९४४) हा शिवराम वाशीकर यांचे पटकथा-संवाद लेखन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाला देखील डावलून चालणार नाही. या चित्रपटातील ‘दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात अनंत मराठे, बेबी शकुंतला यांनी साकारलेल्या बालकलाकार भुमिकेचे भरभरून कौतुक झाले. दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांनीच रामशास्त्री ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. स्वातंत्रापुर्वीच्या काळात अशाप्रकारे मराठी चित्रपटात विविध प्रयोग करण्यात आले. कालानुक्रमे विविध धाटणींचे आणि पटकथेंचा यशस्वी प्रयोग त्यानंतरही होत राहिले, आणि आजतागायत होत आहेत.

स्वातंत्र्यानंतर १९४७ दरम्यान प्रदर्शित झालेला 'जय मल्हार' हा मराठीतील पहिला ग्रामीण चित्रपट ठरला. ग्रामीण जीवनाचे चित्रीकरण करणारा यशस्वी प्रयोग 'जय मल्हार' मध्ये करण्यात आला. सूत्रधार बाबूराव पेंढारकर असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन द. स. अंबपकर यांचे तर कथा-पटकथा-संवाद दिनकर द. पाटील यांचे होते. या चित्रपटातील ग. दि. माडगूळकर लिखित लावण्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यानंतर एकामागोमाग एक असे अनेक दिग्गज लेखक आणि कवी मराठी चित्रपट सृष्टीला मिळाले.

१९५० चा काळ म्हंटला तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ डोळयासमोर उभी राहते. याकाळातच मराठी संस्कृतीत अनेक शाहिर, कवि आणि लेखकांचा उदय झाला. आपल्या तडफदार आवाजाने आणि लेखणीतून या कलावंतानी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे रणशिंग फुंकले. गरजा महाराष्ट्राचा गजर करण्याच्या त्या काळात राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांसारखे रत्न महाराष्ट्राला मिळाली. यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीला आपल्या कलेच्या माध्यमातून नवा साज चढवला. राजा परांजपे-सुधीर फडके-ग. दि. माडगूळकर या त्रिकुटाने एकत्रितपणे याचा काळात 'पुढचं पाऊल' हा चित्रपट बनवला. यांत पु.ल.देशपांडे व हंसा वाडकर प्रमुख भूमिकेत होते. तर गदिमा यांनीही व्यक्तिरेखा साकारली होती. यातील गाणी खूप गाजली. शिवाय ' राम राम पाव्हणं'या ग्रामीण चित्रपटाच्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आवाज त्याकाळात लोकांपर्यत पोहोचला. त्यांचे ‘तू गुपित कुणाला सांगू नको आपुले’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. पी. सावळाराम आणि शांता शेळके यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती.

अमरभूपाळी (१९५१) मध्ये तर कवी, शाहीर होनाजी बाळा यांच्यावरील शाहीरपट आजही रसिक आवडीने पाहतात. विश्राम बेडेकर यांची पटकथा आणि राजकमल कलामंदिरनिर्मित व व्ही. शांताराम दिग्दर्शित हा चित्रपट विशेष गाजला तो, ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘लटपट लटपट तुझं चालणं गं’, ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ लोकप्रिय गाण्यांमुळे! विशेष नमूद करण्याजोगे वैशिष्टय़ म्हणजे १९५२ साली झालेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचे पारितोषिक या चित्रपटाला मिळाले आहे. या चित्रपटाने ख-या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला. त्यानंतर बाळा जो जो रे (१९५१),लाखाची गोष्ट (१९५२), गुळाचा गणपती (१९५२) हे चित्रपट गाजले.

गुळाचा गणपती या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि दिग्दर्शन त्याचबरोबर प्रमुख भूमिका असलेला ‘सबकुछ पुलं’ असा पु. ल. देशपांडे यांचा हा चित्रपट आताची आधुनिक पिढीदेखील आवडीने पाहते. पु. ल. देशपांडे यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध असलेला हा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी राजकमलसाठी हिंदी बालचित्रपट लिहिला. विशेष वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायक पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘इंद्रायणी काठी’ हा अभंग तुफान लोकप्रिय ठरला.

मराठी चित्रपटातील या प्रवासवर्णनात सांगत्ये ऐका (१९५९) हा अनंत माने दिग्दर्शित तमाशापट चांगलाच गाजला. या चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली गं’ ही लावणी तुफान लोकप्रिय झाली. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात तब्बल १३१ आठवडे चाललेला विक्रमी चित्रपट ठरला. त्यानंतर शिकलेली बायको (१९५९), मधुचंद्र (१९६७), मुंबईचा जावई (१९७०) आणि शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१) या चित्रपटांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतले एक गाजलेले पर्व आहे. दादा कोंडके यांची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट 'सोंगाड्या'(१९७१) हा पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला. त्यानंतरचे दादा कोंडके यांचे अनेक चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. सोंगाड्या नंतर मराठी चित्रपटाने कात टाकली. यात भर म्हणजे कृष्णधवल चित्रफितीत दिसणारे सिनेमे रंगीत दिसू लागले. १९७२ सालचा निर्मिती-दिग्दर्शन व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' या चित्रपटाने मराठीत रंगीत सिनेमा दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. श्रीराम लागू यांचा मराठीतील हा पहिला चित्रपट ठरला.

वास्तववादी चित्रपटाच्या यादीत डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित'सामना'(१९७५) या चित्रपटाला प्रमुख स्थान आहे. त्या वेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सहकारी साखर कारखाने आणि सत्तेचे राजकारण या विषयाभोवती फिरणारा हा सामाजिक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरला. विजय तेंडुलकरांचे कथा-पटकथा-संवाद, दिग्गज कलावंतांचा अभिनय आणि अप्रतिम गाणी यामुळे गाजलेला हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविण्यात आला होता. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेलेला पहिलाच मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर बेघर या शांता निसाळ यांच्या कादंबरीवर आधारित, स्मिता पाटीलची प्रमुख भूमिका असणारा उंबरठा (१९८१) हा स्त्री-मुक्ती चळवळीचे पडसाद उमटविणारा चित्रपटदेखील तेवढाच लोकप्रिय ठरला. मराठीतील या गाजलेल्या चित्रपट तालिकेत बहुरूपी (१९८४), पुढचं पाऊल (१९८६), अशीही बनवाबनवी (१९८८), कळत नकळत (१९८९, आत्मविश्वास (१९८९) या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर तुफानी गल्ला गोळा केला. याच काळात मराठी चित्रपट सृष्टीला अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आदी. चेहरे मिळाले.

यात माहेरची साडी (१९९१) हाविजय कोंडके दिग्दर्शित कौटुंबिक मेलोड्रामा तळागाळातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला. अभिनेत्री अलका कुबलला विशिष्ट ओळख निर्माण करुन देणारा हा चित्रपट गल्लापेटीवर तुफान यशस्वी ठरला. माहेरची साडी नंतर स्त्री प्रधान भुमिकांवर आधारित मुक्ता (१९९४), बिनधास्त (१९९९), अस्तित्व (२०००), नॉट ओन्ली मिसेस राऊत (२००३)हे चित्रपट आले.

२००४च्या 'श्वास' या चित्रपटाने मराठी चित्रपट नगरीला आंतरराष्ट्रीय श्वास मिळवून दिला. संदीप सावंत दिग्दर्शित या चित्रपटाने ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळावर पुन्हा एकदा मराठिचा ठसा उमटवला. तसेच ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविलेला हा एकमेव मराठी चित्रपट ठरला. हा चित्रपट गाजल्यानंतर मराठी चित्रपटनिर्मितीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. त्यानंतर वळू (२००८) हा उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला. त्यानंतर मराठीतील अनेक सिनेमे हे साता समुद्रापार जाऊ लागली. याच काळात मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले. याच दरम्यान मराठी अस्मितेवर भाष्य करणारा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा प्रदर्शित झालेला चित्रपट देखील विसरुन चालणार नाही. तर अवधूत गुप्ते यांच्या 'झेंडा' ने राजकारणातच हात घातला. देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळ मिळालं आणि मराठी सिनेमा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाखाणला गेला. शिवाय यावर्षीच्या ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठीचाच ठसा उमटला. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या 'कोर्ट' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

शिवाय जोगवा (२००९), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२०१०), बालक पालक (२०१३) असे विविध धाटणिचे चित्रपट मराठीत होऊन गेले. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’नंतर रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेला गल्लापेटीवर तुफान यशस्वी ठरलेला बालक पालकने पौगंडावस्थेतील मुलांना घेऊन सिनेमा बनविण्याचा नवा ट्रेण्ड मराठीत आणला. पौगंडावस्थेतील मुलांवर आधारित सादर झालेल्या चित्रपटात येलो, फँड्री, टाईमपास, एलिझाबेथ एकादशी,किल्ला इ. चित्रपटांचा समावेश होतो. विशेष म्हणजे यांमधील कैक चित्रपट हे आंतरराष्ट्रीय महोत्सवात यापुर्वीच गाजलेले आहेत. 'शाळा' या सिनेमानेही राष्ट्रीय पुरस्कार तर पत्कावालाच सोबत प्रेक्षकांची दिलखुलास पसंतीही मिळवली. नाविन्यपूर्ण विषय… आकर्षक मांडणी आणि दर्जेदार अभिनय यांनी नटलेल्या मराठी सिनेमांची हि यशस्वी घोडदौड अशीच सुरु राहील अशी आशा करूया.

---पल्लवी बटवाल 

 

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी