Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.