LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
गजानन त्र्यंबक माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर

0.0/5 rating (0 votes)

गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, डिसेंबर २८, १९०० - मृत्यू : नागपूर, नोव्हेंबर २७, १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.

 पूर्वायुष्य 

गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..

 न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकर्‍या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.

 भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

लेखन

१९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.

वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.

वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.

ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबर्‍या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्‍या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.  

कादंबर्‍या

 • अनघा
 • उद्धार
 • ऊर्मिला
 • कांता
 • चंदनवाडी
 • डाक बंगला
 • दुहेरी जीवन
 • नवे संसार
 • नागकन्या
 • प्रमद्वरा
 • भंगलेलें देऊळ
 • मुक्तात्मा
 • मुखवटे
 • रुक्मिणी
 • शाप
 • स्वप्नांतरिता
 • श्रीवर्धन
 • सत्यभामा

लघुकथासंग्रह 

 • रातराणीची फुले
 • शुक्राचे चांदणे

नाटके  

 • देवयानी

ललित आणि राजकीय लेखसंग्रह 

 • अवशेष
 • जीवनसाहित्य
 • परामर्श
 • महाराष्ट्राचे विचारधन
 • माझी नमोवाणी
 • माझे आवडते लेखक
 • माझे लेखनगुरू
 • विलापिका
 • विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध
 • स्वैरविचार

व्यक्तिचित्रणे 

 • व्यक्तिरेखा
 • व्यक्ती तितक्या प्रकृती
 • श्रद्धांजली

आत्मचरित्रपर 

 • एका निर्वासिताची काहणी
 • दोन तपे
 • मी आणि माझे वाचक
 • मी आणि माझे साहित्य
 • मृत्युंजयाच्या सावलीत

प्रवासवर्णनपर 

 • मी पाहिलेली अमेरिका