LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
 संवेदनांच्या काना मात्रा

संवेदनांच्या काना मात्रा

0.0/5 rating (0 votes)

लहानपणी शाळेत असताना भौतिकशास्त्राच्या तासाला सर म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का? पांढऱ्या रंगात सात रंग लपलेले असतात पण नुसत्या डोळयांनी दिसत नाहीत ते लागतो. असं म्हणून त्यांनी तो prism चा प्रयोग केला आणि आम्हाला पावसाळा नसतानाही इंद्रधनुष्य दाखवलं. दीपाच्या कविता वाचतानाही मला अगदी तोच अनुभव आला. रोजच्या जगण्यात तिच्यातल्या कवयित्रीच्या नजरेने अनेक इंद्रधनुष्य लावली आहेत. ... त्यातलेच काही रंग वेचून थक्क करणारी चित्रं रेखाटली आहेत. एकूणच तिच्या नजरेतल्या prism ने हा संपूर्ण रंगसोहळा ती आपल्याला दाखवते. यात जगण्याला जीवन बनवण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या रंगांची उधळण आहे, कुठे दु:ख आहे कुठे प्रेम आहे कुठे जीवघेणी वेदना आहे, तर कुठे तळमळ करणारी सामाजिक व्यथाही आहे.

किती कुठे आणि का
हे प्रश्न आयुष्याला विचारायचे नसतात
अळवावरच्या मोत्यांचे
गुंफून हार करायचे नसतात

असं गंभीर, स्थितप्रज्ञ सारख सांगता सांगता दीपाची कविता अचानक ...

सांज बिलगते कडेकडेने हुरहुर देऊन जाते
क्षितीज केशरी होते आणिक तुझी आठवण येते
असं हळवं वळण घेते आणि आपलीशी होऊन जाते.

अगदी पानांपानांवर भेटणारे रंग जवळून अनुभवताना लक्षात येतं की ... “अरे !!! हे आपल्यालाही भेटलं होतं असंच.... पण त्याची ही बाजू लक्षातच नाही आली " आणि ही जाणीव हेच तिच्या लेखणीचं यश आहे.

मनाची कवाडे भिजू लागली
अता ओल भिंती पुन्हा पावसा
उन्हे दग्ध झाली उरे सावली
तुझी कूस आता पुन्हा पावसा

रोजच्या जगण्यातल्या प्रतिमांतून साकारलेली अशी अगिणत भावचित्र वाचणाऱ्याला अंतर्मुख करतात. मनाच्या संवेदनांतून कविता जन्म घेते आणि आपल्या आयुष्यातल्या संदर्भानुसार आपल्याला कळते.

आभाळाची ओझी सरतात
तिथे माती सुरु होते
जिथे व्यवहार संपतात
तिथे नाते सुरु होते.

अशी निरागस निसर्गाच्या खांद्यावरून सहजपणे व्यवहारी जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी कविता असो नाहीतर ....तत्वं म्हणजे...

मिस्त्रीच्या कानामागची छोटी पेन्सिल
गरज लागली की वापरली .. ठेवून दिली
कायम छोटी असते वापरुन वापरुन झिजलेली
कधी आख्खी पेन्सिल पाहिलीयेस ???
नाहीच मावणार.. जगणं अशक्य होईल
जागाही अशी की लपली पाहिजे
पण त्याची बोचरी जाणीवही पाहिजे..
बेताल, बेभान, बेमालूम जगताना
तेवढं तरी भान हवंच ना

अशी परिचित प्रतिकांतून जगण्याकडे पाहायचा वेगळा दृष्टीकोन देणारी कोनातली दृष्टी असो. पानापानात पेरलेला हा शब्दानुभव खरंच निखळ आनंद देऊन जातो आणि त्याबरोबर अगदी आपल्या वाटणाऱ्या अशा तिच्या संवेदनांशी जोडून जातो. यातल्या बऱ्याच कवितांतल तिचं व्यक्त होणं हे सहज आतून आल्यासारखं वाटतं. कविता लिहायचीच आहे म्हणून केलेली शाब्दिक कसरत नाही हेही जाणवत राहतं. संपूर्ण संग्रहात तिने अनेक छंद हाताळलेत. काही मुक्तछंदात्मक कविताही आहेत. पण या कविता वाचताना त्या शब्दांच्या घट्ट विणीत हळुवार गुफ़लेलं तिचं स्त्रीमन वारंवार डोकावत राहतं.

कुठल्या तरी पेशीला उमजतं
तू आला आहेस समजतं
धावत मेंदूच्या उंबऱ्यावर
ती बेल वाजवते ... तुझ्या आधी
 
अशा काही कवितातून अल्लड अवखळ तरूणी दिसते ... तर......
 
सोसूनीया घाव सारे प्राण माझा जागला
तापलेले ऊन जपले रंग जपला वेगळा
मर्त्य होते मीही अन मर्त्य होती वासना
युद्ध लढले मी स्वत:शी आगळा हा सामना

असं म्हणत कुठे जवाबदारीच्या ओझ्यातच गुरफ़टलेली सोशीक सुशीला. कधी प्रेमिका, कधी खंडिता, कधी विरहोत्कठीता, तर कधी अभिसारिका. स्त्रीच्या संवेदनशील मनाचे असे अनेक कंगोरे असलेल्या कॅलिडोस्कोपमधून दीपाचे शब्द आकार घेत जातात. आणि वाचकाला त्याच्या भाविवश्वात घेऊन जातात. पानोपानी गवसणारी तिची ही काव्यप्रतिभा अशीच बहरत खळाळत राहो या मन:पूवर्क शुभेच्छा.

- गुरु ठाकूर.

वैशिष्ट्य

  • लेखक: दीपा कुलकर्णी मिट्टीमनी.
  • प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: ११२ पृष्ठे
  • ISBN-10:
  • ISBN-13: 9788172948740
  • टिचक्या: 767