LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
सत्यसंभ्रम

सत्यसंभ्रम

0.0/5 rating (0 votes)
जुन्या-नव्या जाणिवांच्या वेध कथा

कवी दत्तात्रय सैतवडेकर यांचा ' सत्यसंभ्रम \' हा पहिलाच कथासंग्रह . कथासंग्रह जरी पहिला असला तरी , कथा वाचल्यानंतर त्यात पहिलेपणा कुठेही जाणवत नाही , इतक्या कथा उत्कंठावर्धक व वैशिष्ट्यपूर्ण आहेत . लेखकाच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी हा कथासंग्रह प्रकाशित झालाय , साहजिकच , या कथांना एक प्रगल्भता , चिंतनशीलता , आणि प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी लाभलेली आहे . आणि यातूनच नव्या जुन्या जाणिवांचा बाज सांभाळण्यात लेखक यशस्वी झाला आहे .

कथासंग्रहाच्या सुरवातीच्या दोन कथा , अनुक्रमे ' प्रतीक्षा - १ ' आणि ' प्रतीक्षा - २ ', ह्या दोन्ही कथा सामान्यातल्या अतिसामान्य , झोपडीत राहणा ‍ ऱ्या माणसांवर बेतलेल्या असून , गरिबी , दारिद्र्य यामुळे आयुष्याची फरपट कशी होते , स्वप्ने अपुरी कशी राहतात , शिक्षण - ध्येय अधुरे कसे राहते यावर प्रकाशझोत टाकतात . बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झाला तर सात लाख रुपये मिळतात . दोघे गेले तर चौदा लाख मिळतील , दारिद्र्य नष्ट होईल . अशी विचारधारा अंगिकारणारा गणप्या आपल्या बापाच्या मृत्युनंतर सात लाख मिळाल्यावर खूश होतो . जीवन बदलते . झोपडीच्या जागी टॉवरचे स्वप्न तो पाहतो . आई जेव्हा झोपडीच बरी म्हणते , तेव्हा ' आये , जरा इचार कर , आपल्या सात पिढ्यांनी सात हजार पायले होते का कधी . या झोपडीनं सात लाख दिले आपल्याला .' माणूस गेल्याचं दुःख नाही . पैसा सर्व काही मानणारा गणप्या आणि नेमकं या विरोधी विचार करणारा चंद्या . आपल्या शिक्षणासाठी दारू सोडणारा , वडापावची गाडी लावणारा , काबाडकष्ट करणारा बाप चंद्याला सच्चा वाटतो आणि म्हणूनच तो बॉम्बस्फोटातून सुखरूप घरी येतो , तेव्हा बा ला घट्ट मिठी मारून तो रडतो . ' आई , मला बा हवाय ' साठी रडणारा चंद्या .. शिक्षणासाठी धडपडणारा चंद्या ... एकाच समाजात , एकाच कुटुंबात , समाजव्यवस्थेतील मानवी मन आणि विचारधारांचं अनोखं दर्शन या दोन कथांतून आढळतं .

' हॅलो , व्हिजिलन्स हिअर ' सारखी कथा वाचकांना अंतर्मुख करते . सुरक्षा यंत्रणा , भ्रष्टाचार आणि देशद्रोही ... सारी यंत्रणाच कशी वरून सुशोभित आणि आतून पोखरली आहे . आदर्शवाद किती फोल आहे , याचं मनोज्ञ दर्शन या कथेत घडतं . ' विधिलिखित ' ही कथा सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धांना हात घालणारी आहे . या कथेत बुद्ध ‌ विवाद , श्रद्धा - अंधश्रद्धा , नात्यांची गुंतागुंत , आणि मध्यमवर्गीय जगण्यातील खाचखळगे , ताणतणाव इ . चे चित्रण आढळते . ' नालायक ' सारखी कथा समाजातील , विशेषतः बेकारीचं दुष्टचक्र अधोरेखित करणारी कथा आहे . ' वांझोटा ' सारखी कथादेखील जितकी लक्षवेधी तितकीच वाचकांना अंतर्मुख करणारी , चटका लावणारी आहे . सरळसोट , मध्यमवर्गीय , परंपरागत जीवन आणि सर्व काही सांभाळत ... ध्येये पूर्ण करत उशीराने सुरू झालेले वैवाहिक जीवन . नातेसंबंधातील ताणतणाव , घटस्फोट , मानवी शरीर आणि भावना यांचे मीलन इ . बाबींशी समरस होताना झालेली घुसमट आणि त्यांतून निर्माण होणारे प्रश्न इ . बाबींचा शेवट करताना , लेखकानं जे धक्कातंत्र वापरले आहे , ते वाचकांना विचार करायला लावणारे आहे .

' जनानखान्याचा संप ' ही या संग्रहातील सर्वाथाने वेगळी ठरणारी अशी कथा आहे . एक वेगळा प्रयोग , वेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्यातही लेखक यशस्वी झाला आहे . वर्तमानात कुठेही न दिसणारे पण आपले अस्तित्त्व कथेच्या माध्यमातून समर्थपणे साकार करणारे विलासपूरचे महाराज खुशालसिंह , त्यांचे प्रधानजी सेवक , पुढारी , सरकार यांचा वावर आणि प्रभाव , त्याचप्रमाणे त्यांच्या राण्या , त्यांचे महाल .. राण्यांची नावे - मोहिनी , मेनका , उर्वशी , कमलिनी , रंभा , गुलाब , सदाफुली , चमेली , चंदा , इ . इ . आपणांस एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात .

सैतवडेकर यांच्या ह्या कथा वाचल्यानंतर , त्यांत नवथरपणाचा अंश कुठेही सापडत नाही . मधु मंगेश कर्णिकांनी या संग्रहाला शुभेच्छा देताना म्हटलंय , ' सैतवडेकरांच्या कथेवर नवकथेचा फारसा प्रभाव नसला तरी , मराठी कथेची परंपरा तिला चांगली अवगत आहे . आशय , अभिव्यक्ती आणि रचनेतील सौष्ठव यामध्ये सैतवडेकरांची कथा कुठेही उणी पडत नाही .

विषयांना अनुरूप भाषाशैली लाभल्याने या कथा वेगळी उंची गाठतात . लेखनातील ताजेपणा आणि सराईत शैली अधोरेखित करतात . सैतवडेकर हे कवी असले तरी , त्यांच्यातील कवी या कथांमधून लुडबूड करत नाही . ते तटस्थपणे कथेकडेच पाहत असल्याने कथेतील प्रयोगशीलता जपण्यात ते यशस्वी झाले आहेत .

वैशिष्ट्य

  • लेखक: दत्तात्रय सैतवडेकर
  • प्रकाशक: कोमल प्रकाशन
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: १६७ पृष्ठे
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 753