LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

सप्तरंग

साहित्य, पत्रिका, ज्ञान-विज्ञान, विचारधन, दिनविशेष ई.
इथे लेख, कविता, ज्ञान-विज्ञान, विचारधन अशा बहुआयामी विषयांवर पुस्त करू शकता.
माझे सप्तरंग
चिमणी चिमणी दाणा दे

चिमणी चिमणी दाणा दे

0.0/5 rating (0 votes)

मी शांतपणे अंगणातली ती घटना बघत होते. आता अशा एकटक बघण्याचाही मला कंटाळा आला होता, पण म्हातारपण जळता जळत नव्हतं, आणि दिवस माझा सरत नव्हता. कितीही आळस केला तरी पहाटेला गादीत लोळण्यापेक्षा असं एकांतात टक लावून पहाणेच आता माझ्या नशिबी होते. विचार करणा-याचे हे दुखणं असतं. वेडं म्हणायचं तर आमच्या प्रत्येक वाक्यागणित सुभाषिते बाहेर पडत असतात. प्राध्यापक विधा फडके बोलायला उभ्या राहिल्या की, सारे सभागृह शांत होते. तास दोन तासाच्या व्याख्यानानंतर तरुण, तरुणी, निवृत्त, स्त्री, पुरुष असा सर्व भेदभाव गळून पडतो. सर्वांचा एकच घोळका माझ्या भोवती पडतो. गेली तीस वर्षे मी हे अनुभवतेय. विषय कोणताही असो पूर्ण तयारीनेच मी मार्इकसमोर उभी रहाते. खुशखुशीत बोलत मी समोरच्यांच्या काळजाला हात घालते. समस्येवर तोडगा शिकवत बसण्याचा शहाणपण मी कधीच करीत नाही. ते स्वातंत्र श्रोत्यांना देते. त्यांना त्यांचे निर्णयापर्यंत आणून सोडते. कधी कधी मराठी सुभाषिते, संस्कृत श्लोक यांची फोडणी देवून माझे विषय अधिक परिणामकारक करते.

माझ्या व्याख्यानाची घडी मी स्वत:च बसवली आहे. त्याला कीर्तनाचा बाज आहे. आणि अनुभवांचा साज आहे. हयाच फडके बार्इ आर्इ म्हणून घरात वावरतात तेव्हा मात्र प्रचंड हलव्या बनतात. चिंतनात रंगतात. आजही पहाटेचा वारा झोंबतोय, अगांवरची शाल मायेची उब देतेय. या वयात प्रत्येक गोष्टीबरोबर आपले नाते जडलेले असते. कुठल्या तरी आठवणी प्रत्येक वस्तुला चिकटलेल्या असतात. त्यांची वीण पातळ होत नाही की मायेचा धागा कधी विरत नाही. ही शाल आमच्या प्रणिताने मला दिलेली, आमचे लग्नाचे वाढदिवसाला ही काळी शाल पाहिल्यावर मी काय खुश झाले होते ? आमचे हे नाराज झाले होते. म्हणे त्यांच्या कुलस्वामीला काळा रंग धार्जिण नाही. पण मला तर ही जरीकाम केलेली शाल खूप आवडली. प्रणिताने खास कुलू मनालीहून माझ्यासाठी ती आणली होती. हे असेच असते, आता आम्ही आठवणीत गुंतून रहातो. या शालीसारखे स्वत:ला गुरफटून घेतो. उबदार स्पर्शातून जुन्या आठवणीला उजाळा देतो. माझा झोपाळा हयांनी मुदामहून करुन घेतला, माझ्यासाठी,. मागच्या पडवीत बसवला. या पितळी कडया आणायला स्वारी मुद्दामहून तुळसीबागेत गेली होती. झोपाळा झुलू लागला आमचा सकाळचा चहा किती तरी वेळा येथेच व्हायचा सकाळचे पेपर वाचत स्वारी येथेच रामरक्षा म्हणायची.

आज रामरक्षाही नाही आणि तो सकाळचा चहाही नाही. निवृत्तीनंतरची स्वप्ने अर्धवट ठेऊनच हे गेले. जाणे अचानक होते पण रुखरुख लावून गेले. त्यांना प्रिय म्हणून मी चहा सोडला आणि अगतिकता म्हणून सकाळचा पेपर वाचणेही मी सोडले. त्याच त्याच बातम्या वाचण्यापेक्षा मी बांबूचे बेटात स्वत:ला पहात बसते. भूतकाळाला गोंजारत बसते. ज्यांना भविष्यकाळ घडवायची ताकद नसते अशा बळांसाठी भूतकाळात रमण्यासारखा दुसरा विरंगुळा नसतो. समोरचा फणस ! आमच्या अनेक घडामोडीचा साक्षीदार घराच्या परसदारी असाच कधीतरी लावला, वाढला, आता तोही माझ्या सारखाच थकलाय. आम्हा थकलेल्या जीवांच एक बरं असतं. आम्हाला जळवा सारखंच वृध्दत्व चिकटलेल असतं. आमचं दु:खद आठवणीचं दूषित रक्त ते पित असतं. टम फुगल की ते गळून पडत. पाहिलत, त्या खोबणीत पाहिलत ? त्या ढोलकीत पोपटांची वस्ती आहे. रोज पहाटे पासून मला त्यांची संगत असते. माझे असणे आता त्यांनाही खटकत नाही. कदाचित माझा विदपहवी मालकी हक्क त्यांना मान्य असावा. रोज सकाळी या ढोलीत लगबग सुरु होते. या वसंतात पीलं चीऊचिऊ लागतात. तो सखा केव्हाच उडालेला असतो. ती आर्इ मात्र पिलांसाठी दाणापाणी गोळा करत असते. त्या इवल्याश्या चोची फाकवून पील्लं हाक मारत असतात. मी त्यांची समजूत घालत असते. आमचा संवाद मुक्त असतो. मी चक्क त्यांचेशी बोलते.

त्यांना आर्इची आशा लावते. आर्इ येर्इल म्हणून त्यांना सांगते. त्यांनाही ते कळत असावे. थोडावेळ किलबिलाट बंद होतो. वरच्या फांदीवर सळसळ वाढली की परत त्या गुलाबी चोची ओरडू लागतात. आर्इ खचकन येऊन डोलीवर बसते. सोबतचा खाऊ भरवते आणि परत नाहीशी होते. मी माझ्याच आठवणीत रमून जाते. प्रणितानंतर आम्ही पाळणा थांबवला. तो खरं तर माझाच निर्णय होता. यांना घराण्याला वारस पाहिजे होता. म्हातारपणीची काठी पाहिजे होती. पण माझ्या प्रकृतीला आणि प्रवृत्तीला दोघांनाही ते सुख पचणारे नव्हते. आम्ही थांबलो. तळहाताच्या फोडाप्रमाणे झेलूला वाढवले, भरवले. एकदिवस घरटे सोडून तीही निघून गेली. पंखात बळ मिळाल्यावर पिल्ले कशी थांबणार?

मी माझीच समजूत घातली. प्रणिता गेल्याच दु:ख नव्हत. दुःख होत ते तीनं आम्हाला समजूत न घेतल्याचं. यांना रिटायर्ड व्हायला, दोनच तर वर्षे बाकी होती. झेलू आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षाला होती. सर्व कस सुखात चाललं होत. हौसेने पासपोर्ट काढून तयार होते. प्रणिता दूर जर्मनीत जॉब आला होता. गेली कित्येक दिवस ती हॉस्टेललाच राहिली होती. तरी भारतात होती, आधार होता, पण पंखाना प्रगतीची आस लागली होती. पंखाना आत्मविश्वासाचे बळ मिळाले होते. आम्ही पिल्लांचे प्रगतीचे आड यायचे नाही असे ठरवले.

विमानाने झेप घेतल्यावर प्रथमच मी मला अपंग समजले, एकांताची जाणीव झाली. माझ्या स्वभावाप्रमाणे मनात पाल चुकचुकली, प्रणिता परत आली नाहीच तर? यांनी माझी नेमकी व्यथा ओळखली. समजूत घातली प्रणितावरील संस्कारच तिला परत भारतात घेऊन येतील अशी वेडी आशा सुध्दा लावली. त्या ढोलीत पहा, ती पिल्ले पुन्हा पुन्हा वाट बघताहेत. माझी छोटीही अशीच वाट बघायची. ही पिल्ले झटकन कधी मोठी होतात आणि कधी वाढतात तेच कळत नाही. एकदम मोठी होतात. आणि अचानक पारखी होतात. माणसं काय आणि पक्षी काय निसर्गाचा तो नियमच असावा. आपण नंतर हळहळत रहातो. त्यारात्री प्रणिता अचानक पणे आली. जर्मनीहून येताना न कळविता ती अशी अचानक कधीच आली नव्हती. अचानक आली म्हणून मनात पाल चुकचुकली. एकतर तिचेकडे सामान नव्हते. विमान तळावरुन टॅक्सीने आम्हाला परस्पर एका बडया हॉटेलला घेवून गेली. कॅण्डल डिनरचे आयोजन होते. तिच्या लेखी ते ‘‘ सरप्राइज ‘‘ होते. त्या रात्री मी पार कोलमोडले, पार तुटले. प्रणिताने तसे करायला नको होते. प्रणिताने आमची भेट रियाझशी करुन दिली. जर्मनीत आणि दुबर्इत त्याच्या अनेक सॉॅफ्ट वेअर कंपन्या होत्या. मोठया डिझायनींग कंपनीचा तो मालक होता. श्रींमत होता, देखणा होता पण आमच्या धर्मातला नव्हता. आम्ही कसेतरी ‘डिनर’ उरकले. आम्हाला टॅक्सी पर्यंत सोडायला दोघे आले त्यांनी रजिस्टर लग्न करुन टाकले होते. आमच्या कन्यादानाची त्यांना आवश्यकता वाटली नाही.

आमचे पिलू मोठे झाले होते. पंखात बळ आले होते. त्यांनी भलतीच झेप घेतली होती. मी त्या रात्री खूप रडले. माझे काय चुकले ते शोधत राहिले. पुढचे दहा दिवस नि:शब्द गेले. त्या मुक्या वातावरणात आम्ही दोघांनाही एकमेकांचा आधार होता. आम्ही मुकेपणानेच एकमेकांना खूप समजावले. एकमेकांना सावरले तरी झेलूनी असे फसवायला नको होते. त्या दिवसातही मी अशीच झोपाळयाचा आधार घेत बसे. कडया किरकीरत माझे विचार चालू असत. माझे काय चुकले? हेच मला कळत नव्हते. हे चहा घेऊन येत. खूप वेळ भयाण शांततेत जार्इ. थोडया वेळाने ते विषयांतर करणेसाठी काहीतरी बोलत. पण खरचं ते काहीतरीच असे. माझी वेडी समजूत काढण्याचा तो केवळ एक बहाणा असे. निवृत्तीनंतर दोन वर्ष जेमतेम त्यांनी काढली. प्रणिताच्या त्या निर्णयानंतर त्यानीही हाय खाल्ली होती. ते सर्व हसण्यावर नेत, पण त्यांनाही जखम खोलवर झाली होती. न भरणार्याह जखमा लपवून किती लपविणार? शेवटी याना अॅडमीट करावेच लागले. सर्व उपचार होऊनही सहा महिन्यातच यांनीही माझी साथ सोडली.

आज मी अशी एकटीच आहे. सुधारणा करताना आम्ही संकूचित झालो आमचे संसार आणखी आकुंचित पावत गेले. वयाबरोबर पराधीनता आली आणि कितीही स्वयंपूर्ण आणि निर्भय बनायचे ठरवले तरी एकांताचे दुख काय ते आता मला कळू लागले होते. आज हा बंगला खायला उठतो. प्रणिता वर्षातून कधीतरी त्यात येते, बिलगते. ते काही दिवस किलबिलाटाचे जातात. प्रणिताला मी बाजुला घेते. मायेने हात फिरवते. पुढचा विचार काय म्हणून आडून चौकशी करते. ती निक्षून सांगते. नाही बोलते. मी आग्रह धरते, तरी ती नाही बोलते.

आठ दिवसातच झेलू तिच्या वाटेवर परतते मला तिच्यात मी दिसते. प्रणिताही अशीच एकटी राहिली तर ? झाडाच्या ढोलीतले ते रिकामे घरटे माझी समजूत काढत असते. मी पुन्हा हरवून जाते. झोपाळयाच्या कडया तेवढया किणकिणत असतात. घरटे सोडून पाखरे केव्हाच पसार झालेली असतात. त्यांनी दुसरे आकाश शोधलेले असते.

-विलास नाईक

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • जीवेत शरद: शतम +

 • अपेक्षा +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • सिंहगड किल्ला +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • निरामया +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • ललना लावण्यखणी... +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • 1
 • 2