LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १

0.0/5 rating (0 votes)

नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगताना सर्वप्रथम मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते आणि ती अशी की ही नर्मदा परिक्रमा मी केलेलीच नाही. ही नर्मदा परिक्रमा माझ्याकडून माझ्या गुरुंनी आणि माझ्या नर्मदा माईनी करवून घेतेली आहे, लहान मुलाला आई जशी हात धरून चालायला शिकवते आणि त्याच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आईचं बारीक लक्ष असतं तसच एका बाजूला गुरूमूर्ती प.पू नाना महाराज तराणेकर आणि दुसरीकडे माझी नर्मदा मैया यांच्या सुरक्षा कवचात माझी परिक्रमा पूर्ण झाली. सुरक्षा कवच असणं आवश्यक आहेच, आणि परिक्रमेतला काही भाग हा खरोखर घाबरवून सोडणारा आहे. मी भाग्यवान कारण हे सुरक्षा कवच मला मिळालं! कसं याचा उलगडा पुढे होईलच. परिक्रमेचं अनुभव कथन करताना माझ्या वाणीला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको ही प्रार्थना मी माझ्या मैया ला करेन. याच प्रार्थनेसोबत मी वाचकश्रोत्यांना एक विनंती सुद्धा करेन ती अशी की जशी मी मैयाचं लेकरू आहे तसे आपण सर्वजण ही तिची लेकरे आहात, तेव्हा जो काही भाव आपल्या मनात आहे तो तिच्याच पर्यंत थेट पोहचवावा, मी तुमच्या आणि तिच्यामधील दुआ नाही तर तुमच्यासारखीच तिची एक बालिका आहे, मी निश्चितच भाग्यवान आहे कारण ह्या परिक्रमेची संधी आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मैया आणि गुरू यांची सोबत मला लाभली. बरेचदा आपण काही तरी करावं असं आपल्या मनात असतं आणि कुणाच्या तरी प्रेरणेने आपल्या त्या कार्याची नीव ठेवल्या जाते. माझ्या अनुभव कथनाने आपल्या पैकी एखाद्याच्या जरी मनात नर्मदा माईच्या परिक्रमेची इच्छा निर्माण झाली तरी माझं हे अनुभव कथन सफ़ल झालं असं मी समजेन. संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारी ही एक तपश्चर्या आहे आणि ज्याच्या त्याच्या शक्तिनुरूप आणि प्रारब्धानुसार ती घडवून घेतल्या जात असते हेच समजून घेणं आवश्यक आहे.

 नर्मदा परिक्रमाच का करायची?तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायचा विचार कसा आला? साडेपाच महिने तुम्ही घराबाहेर राहिलात, घरच्यांनी कसं मान्य केलं? असे अनेक प्रश्न या वेळी तुमच्या मनात असणार आहेत. त्या सर्वांची उत्तरं मी माझ्या कडून देण्याचा प्रयत्न करेनच. तुमच्याकडून कदाचित काही असेही प्रश्न येतील ज्यांचे समाधान करण्याची क्षमता माझ्याकडे नसेल, अशी प्रश्न मैयावर सोपवून देऊयात, तिचं काय समाधान करायचे ते करेल! कदाचित तेच तुमच्या परिक्रमेचं बीज ही असेल? बघूयात.

तर नर्मदा परिक्रमाच का करायची? त्याची एक अख्यायिका आहे.

 एकदा गंगा मैया आणि नर्मदा मैया तपश्चर्येला बसल्या होत्या. ज्यावेळी गंगामैया ची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी तिने शंकराला “मला तुमच्यात सामावून घ्या” असा वर मागितला आणि म्हणून शंकरांच्या जटेमध्ये गंगामाईला स्थान मिळालं. नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी “तुम्ही तुमच्या पंचायतनां सकट माझ्या मधे सामावून जा” असा वर तिने मागितला. आणि सर्व पंचायतनांसकट शंकर नर्मदा मैयामधे सामावून गेले. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजा पासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजल्या जातो. इथे “ हर कंकर शंकर” अशी उक्ती प्रचलीत आहे. आणि म्हणूनच परिक्रमा ही फ़क्त नर्मदा मैयाचीच करायची असते. बाकी कुठल्याही नदीला तिची परिक्रमा होण्याचं भाग्य लाभलेलं नाही. तसच नर्मदा नदीचे महात्म्य सांगताना असं म्हटल्या जातं की सरस्वती मधे तीन वेळा स्नान करून पुण्य मिळतं, यमुने मधे सात वेळा स्नान करून पुण्य मिळतं, गंगेमधे एकदा स्नान करून पुण्य मिळतं मात्र तितकच पुण्य नर्मदेच्या केवळ दर्शनाने लाभतं. नर्मदा किना-यावर अनेक शक्ती अदृष्य रुपात आजही तप करीत आहे आणि तिथली पवित्र कंपने आपल्याल्या त्या त्या ठिकाणी जाणवतात देखील!!

तुम्हाला नर्मदा परिक्रमा का कराविशी वाटली असं जेव्हा मला विचारल्या जातं तेव्हा खरच जाणवतं की हा विचार मनात आला आणि पूर्ण झाला असं काही झालं नाही. त्यासाठी मधे बरीच वर्ष जावी लागली. थोडक्यात मी विचार केला आणि मी परिक्रमा केली इतकं सोपं हे गणित नाहीये, त्यासाठी गुरू आणि मैया य दोघांची ही इच्छा असावीच लागते. मी १४ वर्षांची असताना मला पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा कराविशी वाटली, मात्र आज मी परिक्रमा केली त्यावेळी मी चाळीशीला पोचलेली आहे. अर्थात त्या वयात ही परिक्रमा करणं शक्य ही नव्ह्तं , आणि भाग्यतही नव्हतं म्हणून ती तेव्हा झाली नाही, आता होतं म्हणून आता झाली. माझे गुरू प. पू नाना महाराज तराणेकर यांची पोथी मला माझी आजी वाचायला सांगत असे. मी रोज एक पान अशीच पोथी वाचायचे. त्या पोथीमधे नाना महारांजानी जेव्हा जलेरी (नर्मदा मैया सतत डोळ्यापूढे ठेवून) नर्मदा परिक्रमा केली होती त्यातले अनुभव कथा रुपात सांगितलेले आहे. ते अनुभव वाचताना अंगावर काटा यायचा, वाटायचं खरच नर्मदा असं दर्शन देते का? खूप इच्छा व्हायची, पण तो विषय तिथेच थांबून राहीला. मात्र या अनुभवातून एक अनुभव माझ्या कायम लक्षात राहीला तो इथे आपाल्याला मुद्दाम सांगतेय कारण याचा संबंध पुढे मला आलेल्या अनुभवाशी आहे. तर ज्या वेळी नाना महारांजानी परिक्रमा केली तो काळ आजच्या काळासारखा नव्हता. आजच्या सारख्या सेवा, ठिकठिकाणी आश्रम, अन्नदान किंवा अन्नछत्र ठायी ठायी नव्हते. मोबाईल सारखी व्यवस्था ही नव्हती आणि दळवळणाची साधन देखील नाही. रस्ते नाही, किना-यावरची वाट ही अतिशय बिकट आणि घनदाट जंगलाची…असा तो काळ. तर नानामहाराज जंगलातून एकटेच जात होते, संध्याकाळ व्ह्यायला आलेली, भूक तहानेनी व्याकूळ नाना महाराज थोडी विश्रांती घ्यायला म्हणून एका झाडाखाली बसलेले, भूक खूप लागलेली, तहान खूप लागालेली, आणि तोंडने नामस्मरण सुरू. नाना थकले होते, त्यांचा किंचीत डोळा लागतो न लागतो तोच त्यांना आवाज आला, “बेटा दूध पाओगे?” बघतात समोर एक गावकरी महिला सोन्याचा भला मोठा घडा घेऊन उभी. दूध म्हंटल्यावर नांनाची भूक बळावली आणि तो भला मोठा घडा तोंडाला लावून ते घटाघट दूध पिऊ लागले. दूध संपल्यावर घडा तोंडाचा काढतात आणि बघतात तो ती महिला तिथे नाहीच… आता हा सोन्याचा घडा परत कसा कारायचा? कोण असेल ती महिला जिने इतका किमती सोन्याचा घडा असा सोडून दिला असावा? नानांच्या लक्षात आलं, ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात नर्मदा माई होती. नानांनी तिचा घडा तिच्या पात्रात अर्पण केला…. असे अनेक प्रसंग या पोथी मधे आहे.

माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा ही भक्ती पोटी नव्हे तर उत्सुकतेपोटीच निर्माण झाली होती..माझी उत्सुकता माझ्या  नर्मदा माईनी अशी काही शमवली की तिचं रुपांतर आता तिच्या भक्ती मधे आणि तिच्यावरच्या श्रद्धेमधे झालं आहे. मला नर्मदा परिक्रमा का करविशी वाटली याचं एक आणखी कारण आहे.किंबहूना ती अमलात कशी आली त्याचं कारण आहे असं म्हंटलं तरी चालेल. जुलै २०१७ मधे माझं पी.एच.डी चे सबमिशन होते. ते काम मला खरच खूप जड जात होतं. त्यावेळी मी जरा डिप्रेशन मधे गेले होते, मात्र नर्मदा मैयाचे अनुभव ऐकले की खूप प्रसन्न वाटायचं…एक वेळ तर अशी आली की जणू ती मैया बोलावतेय मला असं वाटू लागलं. मला माझ्या बद्दल, आयुष्याबद्दल, अध्यात्माबद्दल बरेच प्रश्न ब-याच वर्षांपासून भेडसावत होते. काहीतरी वेगळं समाधान, कसली तरी तृप्ती मला हवी होती, पण नक्की काय हे काही समजत नव्हतं. अज्ञाताचा अखंड शोध सुरु होता अणि त्याची उत्तरं मला नर्मदा परिक्रमेत मिळतील असा विश्वास मला जाणवत होता. तर असे काही माहित असलेले आणि काही माहितच नसलेले कारणं घेऊन मी परिक्रमेला निघाले.

सुरवातीला मी काही महिने घराबाहेर राहणार म्हंटल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या घरून ही विरोध झालाच, पण माझा हट्ट आणि त्याहून माझ्या मनाची होणारी घालमेल समजून घेऊन माझ्या घरच्यांनी मला परिक्रमेला जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या होकारा शिवाय मला जाता येणं शक्य नव्हतच. १ नोव्हेंबर २०१७ ला ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूरहून मी, ठाण्याहून सौ डोंगरे आणि मुंबई हून सौ मंत्री अशा तिघी जणी सोबत परिक्रमा करू असा निर्णय घेतला…पण निर्णय घेणारे आपण कुणीच नसतो खरं…. ते सगळं तीच ठरवत असते…आणि हे ती नर्मदा मैया वेळोवेळी जाणवून सुद्धा देते. कसं ते पुढच्या भागांमध्ये लक्षात येईलच.

 लेखिका :- सुरुचि अग्निहोत्री नाईक

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • ललना लावण्यखणी... +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • अपेक्षा +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • 1
 • 2