LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

पत्रिका

राजकारण, भटकंती, शिक्षण, इतिहास, व्यवसाय, जीवनशैली, खेळ, मनोरंजन आणि देश-विदेश च्या अनेक विषयांवर नवीनतम मराठी लेख, वृतांत शिवाय खूप काही...
अपेक्षा

अपेक्षा

1.0/5 rating 1 vote

मी काही अशा विषयातला तज्ञ नाही. जे मला माझ्या आयुष्यात सुचले आणि जगताना कामाला आले ते मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे...... माणसाच्या आयुष्यात समस्या भरून राहिल्या आहेत! या समस्या सोडवत सोडवत माणूस जगायला शिकतो. अगदी तान्हे बाळ सुध्दा आपल्या समोर असलेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. भूक लागली की भोकाड पसरते.आई आजूबाजूला असेल तर त्याची समस्या लगेच सुटते.पण तात्पुरता उपाय म्हणून स्वत:चा अंगठा चोखू लागते.हे त्याला कोणी शिकवलेले नसते! पडत झडत प्रगती करणे हे जिवंत माणसाचे लक्षण आहे. अपयशाने खचून न जाता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून नव्याने सुरुवात करणे हेच यशाचे गमक आहे असे अनेक मान्यवर सांगतात. पण कळत पण वळत नाही !

माणसाने आपल्या जीवनात यश अपयशाचे काही आडाखे बांधलेले असतात.अमुक एक गोष्ट मनाप्रमाणे झाली की मी यशस्वी आणि यशस्वी झालो की सुखी असे काही विचित्र आडाखे असतात ते! यश आणि सुख या अवस्थ्या व्यक्तीसापेक्ष आहेत! प्रत्येकाची यशाची (आणि सुखाचीही) व्याख्या वेगवेगळी असते .

एकाचे सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाचे कारण असू शकते!. अपेक्षांबद्दल बोलायचे झाले तर माणसाची एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा तयार होते ती पूर्ण झाली की पुढची! हे न संपणारे चक्र असते! शिवाय प्रत्येकाची हरेक अपेक्षापूर्ती नेहमी होईलच याचाही भरवसा नसतो.मनासारखे काही घडत नाही तेंव्हा माणूस वेड्यासारखा वागायला लागतो.अपेक्षाभंगाचे दुख: त्याला नकोसे होते.त्यातूनच मनावर ताण येतो.सततच्या ताणामुळे माणूस निराशाग्रस्त होतो. वैफल्यग्रस्त जीवन जगायला लागतो.त्याला जगण्यात राम वाटत नाही. असा निराशेने पछाडलेला माणूस चिडचिड करायला लागतो.आजुबाजूच्या माणसांवर खेकसायला लागतो.स्वत:बरोबरच निकटच्या सहवासातील व्यक्तींचे जगणेही अशी व्यक्ती अवघड करू शकते.

अशा व्यक्तीला लोक टाळू लागतात व त्यामुळे त्याला आयुष्यात एकटेपणाला सामोरे जावे लागते.माझ्या एकट्याच्या वाट्यालाच हे भोग का आले म्हणून तो दैवाला दोष द्यायला लागतो.आपल्या या अवस्थेला आजूबाजूचे लोक कारणीभूत आहेत असाही समज तो करून घेतो. आयुष्यातल्या अनेक सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून नकारात्मक गोष्टींना महत्व दिले जाते.यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन व जवळच्या माणसांची साथ मिळाली नाही तर अशी व्यक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक निराशेच्या गर्तेत फसत जाते.नकारात्मक विचारांमुळे व्यसनांच्या आहारी जाते.आजूबाजूच्यांना दुश्मन समजू लागते.निराशाग्रस्त अवस्थेत माणूस काय करेल याचा नेम नाही!

टोकाच्या निराश अवस्थेतील व्यक्ती आत्मघात सुध्दा करू शकते.अशा व्यक्ती च्या जवळच्या व्यक्तींवर सुद्धा याचे दुष्परिणाम होऊ लागतात.खर तर आयुष्यात प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणात काही न काही समस्या असतेच! त्या समस्येच भांडवल करून आपल्या जीवनातला आनंद घालवायचा का त्या समस्येवर योग्य ते उत्तर शोधून पुढे वाटचाल करायची हे त्या त्या माणसाच्या विचार करण्याच्या पद्धती वर अवलंबून असते. एखाद्या समस्येवर एक आणि फक्त एकच समाधान आहे असे मानणे बरोबर नाही. माझ्या अपेक्षे प्रमाणेच घडायला पाहिजे नाहीतर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही असा विचार चुकीचा आहे. कोणत्याही समस्येच, प्रश्नाच एक आदर्श उत्तर असते पण फक्त तेच फायनल उत्तर! त्याला दुसरा पर्यायच नाही ही विचारसरणी तुम्हाला निराश करू शकते! माझ्या मते जीवनात येणाऱ्या प्रत्येक अवघड जटील प्रश्नाला आव्हानाला एक आपल्याला हवे असलेले उत्तर असते!

हे उत्तर म्हणजे अपेक्षापूर्ती /पूर्ण समाधान/सुखच सुख! पण वास्तवात त्या अपेक्षित उत्तरापर्यंत प्रत्येकजण पोहचू शकत नाही! स्वप्नातल्या त्या उत्तरापर्यंत  पोहोचणे कितीही आनंददायक असले तरी त्यासाठी काही किंमत मोजावी लागणार असते. कधी त्या उत्तरापोटी जवळचे नातेसंबंध दूरावू शकतात.कधी कुणाचे अहंकार दुखावले जाऊ शकतात तर कधी अगदी जवळच्या कुणाचेतरी आर्थिक वा वैयक्तिक हितसंबंध अडकलेले असतात, आणि मग असे कुणाला दुखाऊन वा नाराज करून झालेली अपेक्षापूर्ती होणे म्हणजे दुसऱ्या आघाडीवरचे अपयशच की! कारण समाजात राहताना एकमेकांची मने सांभाळणे, एकमेकांना आधार देणेही तेव्हढेच आवश्यक असते! त्यामुळे नुसती अपेक्षित अपेक्षापूर्ती हे त्या समस्येचे समाधानकारक उत्तर असू शकत नाही! कारण त्यातून एका नव्या समस्येचा जन्म होतो आहे.

खरे तर हवे तसे घडले नाही म्हणून निराशेच्या गर्तेत जायची गरज नाही.आयुष्यातल्या गहन प्रश्नाची एकूण पाच उत्तरे असू शकतात.

 १. तुम्हाला अपेक्षित असलेले उत्तर. (पूर्ण समाधान.)  २. अपेक्षित उत्तराच्या अगदी जवळचे उत्तर. (थोडीशी तडजोड.)

३. अपेक्षित उत्तराच्या पन्नास टक्के जवळचे उत्तर (तडजोड.)  ४. अपेक्षित उत्तराच्या वीस पंचवीस टक्के जवळचे उत्तर (एक पर्याय म्हणून केलेली तडजोड.)

५.समस्येला उत्तरच नाही. (तडजोडीची शक्यताच नाही, तुकडा तोडणे हा एकमेव पर्याय.)

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगताना माणूस आत्मकेंद्रित झाला आहे.स्वत:च्या सुखापलीकडे पहायची वृत्ती कमी झाली आहे. घेणे फक्त माहीत आहे, काही देऊनही आनंद मिळवता येऊ शकतो हे नव्या पिढीला शिकविणे आवश्यक झाले आहे. पाश्चात्य संस्कृतीमधील DINK (Double Income No Kid) वा मी आणि माझा जोडीदार अशी संकुचित कुटुंबसंस्थ्या उदयाला येऊ घातली आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी स्वत:च्या आईवडिलांना वृध्दाश्रमात पाठवणारी जमात वाढते आहे. एकत्र कुटुंबसंस्था मोडीत निघाल्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. नवरा बायको दोघेही आजकाल उच्च शिक्षित असतात. मोठ्या मोठ्या डिग्र्या व भरपूर पैसा याबरोबरच वयक्तिक अहंकारही वाढतो आहे. नात्यांमध्ये नव्या नव्या समस्या निर्माण होत आहेत. सुसंवादाचा अभाव आणि छोट्या कुटुंब व्यवस्थेतील घरात कोणी वडीलधारे,समजाऊन सांगणारे/सांभाळून घेणारे नाही, कोणी कुणाला समजून घ्यायला तयार नाही! अशा जोडप्यांचे अहंकारापोटी शुल्लक कारणांवरून घटस्फोट होत आहेत. कुटुंब व्यवस्थ्या धोक्यात आली आहे. ताणतणावामुळे नव्या नव्या आजारांना माणूस बळी पडत आहे. हे सगळे टाळता येणार नाही का? यावर आपण काय करू शकतो यावर थंड डोक्याने विचार केला तर बरेच पर्याय समोर येऊ शकतात.  

आपल्याला माहित आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत.या गरजा पूर्ण होण्यासाठी तो जीवापाड कष्ट करतो. एकदा का या मुलभूत गरजा पूर्ण झाल्या की आपण सुखी होणार असे त्याला वाटत असते. प्रत्यक्षात काय होते ते “एक निवारा” हे उदाहरण घेऊन पाहू. सुरुवातीला निवारा हा शब्द मोघम वापरला जातो.पण निवारा ही गरज पूर्ण होण्याची वेळ येते तेंव्हा समोर अनेक पर्याय दिसायला लागतात. चार भिंती व त्यावर छत हे खरे तर निवाऱ्याची व्याख्या! पण येथे एक घर याला अनेक पर्याय समोर येतात झोपडी,चाळीतले घर, सदनिका, वन बी एच के, टू बी एच के, रो हाऊस, आलिशान बंगला वगैरे वैगेरे. त्या बरोबरच विविध सोयी सुविधा हव्या असतात. जेंव्हा आकड्यांची गणिते जमत नाहीत तेंव्हा चिडचिड व्हायला लागते. जेंव्हा अपेक्षाभंग होतो आणि हेच कारण पुढे निराशाग्रस्त व्हायला पुरेसे असते. हीच गोष्ट प्रत्येक गरजेबाबतीत कमी जास्त प्रमाणात घडत असते!

आपल्या आवाक्यापलीकडे असलेली स्वप्ने पहायला काहीच हरकत नाही, पण ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते मानसिक/शाररिक/आर्थिक अशा सर्व पातळ्यांवरचे  प्रयत्नही करायची तयारी असायला हवी. असे प्रयत्न करूनही मोठ्या स्वप्नांची पूर्तता  झाली नाही तर लगेच निराश व्हायची गरज नाही.आपण पाहिलेले स्वप्न आपल्या आवाक्या पलीकडचे आहे हे योग्य वेळी मनापासून स्वीकारणे गरजेचे असते. वास्तवातल्या आपल्या मर्यादा ओळखल्या की जीवन खूप सोपे होऊन जाते! आत्मपरीक्षण करून स्वत:ला काही प्रश्न विचारले तर हे आत्मभान यायला मदत होऊ शकते. जसे -

आपली बलस्थ्याने कोणती आहेत?  आपल्यातील कमतरता/त्रुटी काय आहेत? आपल्या स्वभावातले चांगले गुण कोणते? आपल्यात कोणते अवगुण आहेत?कोणत्या परिस्थितीत आपल्याला राग येतो/आनंद होतो/चिडचिड होते...... इत्यादी.

स्वत:च्या बद्दल माणसाला योग्य ते ज्ञान असले की निराशाग्रस्त होण्याच्या क्षणी वास्तवाचे भान येते व परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली जाऊ शकते. म्हणूनच म्हणतो --

आनंददायी असते पाहिलेल्या स्वप्नांची भाषा, स्वप्नेच ठेवतात जगण्यात पल्लवित आशा!

जरूर पहावीत स्वप्ने पण वास्तवावर घासून, येऊ शकते नाही तर जीवनात निराशा सपाटून!

भंगली स्वप्ने म्हणून काही संपत नाही वाट, डोंगर दऱ्यातही असतो जरूर एक दुर्गम घाट

आली जर वास्तवात म्हणती का त्या स्वप्ने? आले जे समोर सत्य साजरे करावे जगणे

धावती का जीव तोडून मृगजळामागे सगळे? कल्पनाविश्व नेहमी असते वास्तवापेक्षा वेगळे!

तेंव्हा वास्तवात जगा, आनंदात जगा!

--- प्रल्हाद कोंडीबा दुधाळ.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • निरामया +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • ललना लावण्यखणी... +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • सिंहगड किल्ला +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • 1
 • 2