LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

पत्रिका

राजकारण, भटकंती, शिक्षण, इतिहास, व्यवसाय, जीवनशैली, खेळ, मनोरंजन आणि देश-विदेश च्या अनेक विषयांवर नवीनतम मराठी लेख, वृतांत शिवाय खूप काही...
जीवेत शरद: शतम

जीवेत शरद: शतम

0.0/5 rating (0 votes)

आज पहाटे फिरायला गेलो असताना, पार्कात एका बेंचवर तीन वयस्क गृहस्थ गप्पा मारीत बसलेले दिसले.  तिघेही सत्तरी पार केलेले, पण उत्साह मात्र दांडगा होता.  ते बहुतेक जुने मित्र असावेत, कारण एकमेकांशी अरे कारेनेच बोलत होते.  कां कुणास ठाऊक, पण कुतूहल वाटलं म्हणून मीही शेजारच्याच एका बेंचवर त्यांच्या गप्पा ऐकत बसलो.  

त्या तिघांमधील एकाचा आदल्या दिवशी म्हणजे कालच पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता.  त्या विषयी ते बोलत होते. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी व सुनांनी घरी एक पार्टी आयोजित केली होती, त्याबद्दल त्यांची चर्चा रंगली होती.  पार्टीला आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी त्यांना "जीवेत शरद: शतम" अशा शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर एक जण मस्करी करीत म्हणाले, "साल्या तुझी लाकडं तिकडे मसणात पोहोचली आणि तो वेडा म्हणतो, "जीवेत शरद: शतम"... त्यावर तिघेही ख्या ख्या करत हसले. 

"काही म्हण पण तात्या तू लकी आहेस बाबा.  तुझ्या मुलांचं किती प्रेम आहे रे तुझ्यावर... आणि सुना पण किती काळजी घेतात ना?  अगदी पोटच्या मुलींसारख्याच"

"खरंय रे नाना, त्या बाबतीत मी नशिबवानच आहे बघ.  नाहीतर आपण हल्ली बघतोच ना.... म्हातारी माणसं म्हणजे घरात अडगळ झाली आहेत नुसती.  त्या बाजूच्या बिल्डिंग मधल्या शुक्लाजींचे हाल बघितले?  त्यांना ते पोटॅशियम की सोडियम काहीतरी कमी झालंय म्हणे,  त्यामुळे त्यांना हल्लीचं काहीच आठवत नाही. वीस पंचवीस वर्षे जुन्या गोष्टी आठवतात, त्यावरच मोठमोठ्याने त्यांची एकसारखी बडबड सुरु असते आणि इकडे मुलगा आणि सून वैतागतात,  नको नको ते बोलून त्यांचा सतत अपमान करीत असतात.  म्हातारा कधी एकदाचा मरतो ह्याचीच जणू ती दोघं वाट पाहत आहेत.  देवा,  नको रे इतकं आयुष्य... अन नको तो त्रास.  जोपर्यंत हातपाय धड आहेत, तोपर्यंतच सगळं ठीक आहे.  पण असं परावलंबी होऊन जगण्यापेक्षा आणि सगळ्यांना नकोसं होण्यापेक्षा आधीच डोळे मिटलेले बरे....,"

"खरंय तुझं...." म्हणत दुसऱ्याने त्यांना दुजोरा दिला. 

वातावरण अचानक गंभीर झालं.  

एवढा वेळ गप्प बसलेले तिसरे गृहस्थ अचानक बोलले, "पण मी काय म्हणतो तात्या, नाना, दोघेही नीट ऐका... असं अचानक मरण येण्यापेक्षा माणसाने भरपूर आयुष्य जगावं.  ते अल्झायमर्स, पार्किसन्स, पॅरालिसिस सारखे असे कुठले तरी रोग माणसाला व्हावे, ज्यामुळे माणूस मरतही नाही आणि धड जगतही नाही"

इतर दोघे त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागले.  "अरे काय वेड लागलंय का तुला?  कशाला हवे ते रोग?  ह्या असल्या रोगांमुळे रुग्णाला तर आहेच पण घरातल्या लोकांना किती त्रास होतो ह्याची कल्पना आहे का तुला?"

" हो आहे ना.. पुरेपूर कल्पना आहे.  म्हणूनच तर म्हणतो, आपल्यासोबतच घरच्या लोकांना पण त्रास होईल असा रोग व्हावा.  तात्या तू विचार कर,  जर तुला आताच मरण आले, तर तुझ्या मुलाला व  सुनेला किती दुःख होईल, ह्याची तुला कल्पना आहेच.   पण तुला जर एखादा असा दुर्धर रोग झाला तर तुला होणारा त्रास त्यांच्याच्याने बघवणार नाही.   त्यांनाही प्रचंड त्रास होईल.  आणि एक वेळ अशी येईल की, तुझी ह्या त्रासातून सुटका व्हावी ह्यासाठी ते देवाजवळ प्रार्थना करतील. आणि अशा वेळी जर तुला मरण आले, तर त्यांना होणाऱ्या दुःखाची तीव्रता आजच्या इतकी राहणार नाही, उलट सुटका झाली एकदाची - तुझी व त्यांची- असेच त्यांना वाटेल.  अरे जी माणसं आपल्यावर प्रेम करतात, त्यांना दुःखात लोटून जाण्यात काय अर्थ आहे?  उलट, आपल्या जाण्याचा त्यांनी उत्सव साजरा केला पाहिजे"     

आजोबांचे ते तत्वज्ञान सहज पचनी पडण्यासारखे नसले तरी गंभीरपणे विचार करायला लावणारे नक्कीच होते.  खुप अस्वस्थ वाटायला लागलं. जड पावलांनी घरी आलो आणि लिहायला बसलो.  तुमचे विचार जाणून घेण्यासाठी....

- प्रदीप मार्कंडेय, नागपूर

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • भन्नाट कातळशिल्प +

 • निरामया +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • जीवेत शरद: शतम +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • सिंहगड किल्ला +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • अपेक्षा +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • ललना लावण्यखणी... +

 • पाऊस +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • 1
 • 2