Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
आमचे मित्र भाऊ मराठा यांनी जिंजी किल्ले समूहातील पाचवा किल्ला शोधला त्याची हि कहाणी एकवार नक्की वाचा-
एखाद्या भव्य आसनासारखा दिसनारा हा किल्ला जिंजी समुहापैकी एक आहे. एक तप दक्षिणेत घालवल्यावर हा किल्ला नजरेस पडला हे नशीबच म्हणायचे. कित्येकदा मनात विचार येत होता की चंद्रगिरी पहायचा पण वेळ मिळत नव्हता आणि तिकडची वाटही कुणाला ठाऊक नव्हती शिवाय पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्यांपासुन स्थानिक नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच तिकडे न जाण्याचाच सल्ला दिला. शेवटी हट्टाला पेटून 17 मे 2015 ह्या दिवशी आम्ही चंद्रगिरीच्या अर्ध्यावर पोहोचलो आणि समोरच्या उंच डोंगरावर तटबंदी दिसली. चंद्रगीरीच्या डाव्या टोकावर पोहचल्यावर तिथे नक्कीच किल्ला असल्याचे आढळून आले. पुरेसा वेळ आणि तिकडे जाण्याचा मार्ग माहित नसल्यामुळे पुढच्या खेपेला तिकडे जायच ठरल.
शेवटी 2ऑगस्ट 2015 रोजी राजगिरी आणि चंद्रगिरीच्या मधुन मार्ग काढत निघालो. सोबत बाळासाहेब येवले हा जिगरबाज पुणेकर होता. दोन्ही टाक्यांच्या मधे कोपर्यात एक हनुमानाचे मंदिर आहे. या मंदीराला बगल देत उजव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर एक बोगदा लागतो तो पार केल्यावर उजव्या वळणावर एक तटबंदी आहे. आज ज्या ठिकाणावरून तटबंदीतून वाट गेली आहे त्या ठिकाणी एखादा दरवाजा असावा असा अंदाज आहे. पुढे निघाल्यावर पायवाटेने जंगलाकडे जावे लागते. दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे लचके तोडू पहातात. कारण फक्त लाकुडतोड करण्यापुरताच ह्या भागाचा संबंध उरला आहे. दहा ते पंधरा मिनिटे चालत गेल्यावर काहीशा उंचावरची एक चौकी लागते. ही चौकी आजही अतिशय भक्कम, दणकट आणि सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे आजही ही चौकी पार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
चौकी पार करून पुढे आल्यावर उजव्या बाजूला तटबंदी दिसु लागते. हा जिंजीचा सहावा किल्ला होय. ह्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन तास मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला परंतु पदरात अपयशाच आले. सहाव्या किल्ल्याचा नाद सोडला आणि काही अंतर परतीची वाट चालल्यावर उजव्या बाजूला पाचव्या किल्ल्याकडे निघालेल्या फाट्यावर वळण घेतले. ह्या पायवाटेवरच्या फड्या निवडुंगाने आम्हा दोघांनाही जेरीस आणले कारण एक काटा माझ्या गुडघ्याच्या सांध्यात घुसला तर आमच्या मित्राच्या गुडघ्याच्या वाटीला काटा टोचला. एवढासा निवडुंग पण त्याने आमच्या शोधमोहीमेला क्षणार्धात निकालात काढले.
परत फिरण्यासाठी मन मानत नव्हते मग येवले उठले आणि म्हणले भाऊ शिवरायांचे मावळे आपण हार मानायची नाही. जय शिवराय.....
शिवरायांच नाव घेतल्यावर दगडधोंड्यानाही नवसंजीवनी मिळते मग काय घेतल महाराजांच नाव आणि गुडघे झटकून पुन्हा पायवाट धरली. पुढे निघण्याचा निर्णय घेतला खरा पण खरी परीक्षा तर अजूनही बाकीच होती. इथुन पुढच्या वाटेवर लाकुडतोड करणारांचही येण जाण नसल्यामुळे पुढच्या वाटेने नुसतीच जाळकांड माजली आहेत. त्यात सकाळपासून बरसणार्या पावसाचे पाणी पानापानावर तसेच होते. आम्ही कमरेपर्यंत चिंब भिजलो होतो. इथुन पुढची वाट अजिबातच पाठ सरळ करू देत नाही. मधुनच एखाद्या खडकावर मोकळीक मिळते पण पुन्हा तोच खेळ सुरू होतो. काही ठिकाणी गुडघ्यावर बसुन तर काही ठिकाणी सरपटत जाण्याखेरीज उपाय नाही. जगलाचा हा मार्ग चढ धरु लागतो. मग एक महाकाय शिळा लागते ह्या शाळेच्या अगदी समोरच एक भला मोठा धोंडा फक्त दोन दगडांच्या आधारावर उभा आहे ह्याच्या तळाशी असलेल्या दगडापेक्षा तो दुपटीहून अधिक मोठा असल्यामुळे विशेष लक्षवेधी ठरतो.
पुढे काही अस्तव्यस्त शिळा पार केल्यावर पुन्हा जंगल लागते ते थेट चंद्रगिरीच्या मागच्या बाजूला पायथ्याशी बाहेर पडता येते.
बाहेर पडल्यावर समोरच पाण्याचा डोह आहे ह्या डोहाच्या गढूळ लाल पाण्यामुळे इथे पाळीव प्राणी येत जात असणार याची खात्री झाली. गढूळ पाण्यात किल्ल्याचे प्रतिबिंब दिसले आणि जीव हरखून गेला. ह्या डोहाला वळसा घालून पुढे आलो आणि एका झाडाखाली शिळेवर बसुन मनसोक्त जेवलो आणि मग येताना जमा केलेले काटे हातापायातून काढण्याचा कार्यक्रम उरकून गडाकडे निघालो.
जय जिजाऊ जय शिवराय.
साभार- आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.