Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
किनारा
विशाखा नंतर तब्बल १० वर्षांनी १९५२ मधे किनारा का काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशाखे मधील तळतळती ज्वाला मात्र नंतर तितकी प्रखर जाणवली नाही. विशाखानंतर खरंतर १९४९ साली समिधा हा गद्यकाव्य संग्रह प्रकाशित झाला होता परंतू विशाखेनी रसिकांच्या मनावर घातलेली भुरळ समिधा ला मिळू शकली नाही. विशाखेतील गेय कवितांनंतर समिधा सारख्या गद्य कविता ह्या जणू कुसुमाग्रजांचे प्रतिनिधित्व करायला तयार नव्हत्या आणि म्हणूनच विशाखा नंतर १० वर्षांनी देखील किना-याची तुलना विशाखा बरोबर केल्या जाऊ लागले.विशाखेनंतर आता कुसुमाग्रज काय लिहितात याची दहा वर्ष वाट पहात असणारा रसिक वर्ग "किना-या"वर आनंद व्यक्त करू लागला, मात्र अभिव्यक्ती, विषय,रचनाकौशल्य या सा-याच बाबतीत विशाखाच वरचढ ठरला. मात्र किना-याचं वैशिष्ट्य अस म्कि कुसुमाग्रजांच्या गद्य लेखनास सुरवात झाली ती किना-यानंतर. त्यात मग कधी खंड पडला नाही.
किना-याचा तुलनात्मक अभ्यास केला असता विशाखा जरी श्रेष्ठ ठरत असेल तरीही किना-याचा वेगळा अभ्यास करताना किना-यातील कवितांचे विषय मांडणी यांच्यावर राष्ट्र वादाचा जस्त प्रभाव जाणवतो. "माझा हिंदोस्थान", "माता", "आवाहन"
"अजिंक्य निर्धार", " जय भारता", या सा-राच कवितांमधे राष्ट्र्वाद उफ़ाळून येतो. याचे कारण कदाचित स्वातंत्र्यसमिपता असू शकते.किनारा सरवच दृष्टीने किनारा ठरला विशाखेतील तपस्वी वृत्तीचे फ़ळ जणू किना-यात लाभलेले दिसत होते...१० वर्षांची साधना किना-याच्या रुपाने सांगतेवर आली होती. कदाचित त्यावेळी कुसुमाग्रज स्व:तला म्हणत होते.
का अजून जीवा जगसि जळसि अकेला?शुक्राचा तारा तळपत देख उदेला
विझवून दिवे हे दाहक हृदयामधले, विश्रांत सख्या हो, सावरते ही बेला..
या विश्रांत अवस्थेतून जन्माला आलेली प्रेम कविता जरी विशाखे इतकी प्रखर नसली तरी त्यातून आलेली व्याकुळता मात्र मन हेलावून टाकणारी आहे.
निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी निळा, रखरखती भवताली आता माध्यान्हीच्या झळा
किंवा
होते एक दिनी अशांत जळते जे अंतरी सौख्यद, त्याची शीतल मृत्तिकामय उरे आता समाधी इथे
किंवा
येऊन पुढती बसुनी घडिभर, गेलिस करून मंजूळ कूजन
आठवणीने आहे अजुनी, विचलित हे तिमिरांकित जीवन
या ओळीतली व्याकुळता पृथ्वीच्या प्रेम गीता सारखी झणझणीत नसली तरीही ती केवळ प्रेमच नव्हे तर सामजिक तणावाने ग्रासलेली आणि अध्यात्मिक कल असलेली जाणीव देऊन जाते. त्यात कुठेतरी उपहासाची लकेर जाणवते. ईश्वरी सत्तेला झुगारून पुढे जाण्याची वृत्ती विशाखेची तर तीच ईश्वरी सत्ता आस्तिकतेच्या किना-यावर ठेवणारा किनारा..तरीही आस्तिकता आणि नस्तिकता यांच्यात झुलत राहणारे त्यांचे मन कधी त्यांना म्हणत होते..
अससी सता मला अज्ञात, कणाकणांतुन तव कानोसा घेतो जरी जगतात
नदी किनारी अमल जळातून, गमते पळभर हो तव दर्शन
तोच पडोनी पर्ण लोपते प्रतिमा जलवलयांत
एकीकडे त्या ईश्वराला शोधण्याची तीव्र इच्छा, अन दुसरीकडे जिथे ईश्वराचे भास होतात तिथे पानांच्या पडण्यामुळे लोपून गेलेले स्वत:चे प्रतिंबिंब कुठेतरी आंतरीक ईश्वराचाच प्रत्यत कवीला देत नसेल? किना-यात कुसुमाग्रजांनी प्राधान्य दिले ते अनुभूतीला. याच संग्रहापासून त्यांची कविता ही अभिजातवादाकडे कललेली दिसते. उषास्वप्न सारख्या त्यांच्या कवितेत आत्मानुभुती होत नाही तर स्वप्नरंजनात देखील मध्ययुगीन लोकाभिरुचि व्यक्त होते ती अशी..
कवेत मज ओढूनी फ़िरवूनी करा कुंतली, मदान्ध नयनातुनी नयनी वारुणी ओतली
मुलायम जलापरी परिमलार्त वायूपरी, सुवर्णमय मंचका बघुनी थरारे उरी
अशी ही स्वप्नरंजनाची मोहवून टाकणारी, चित्र उभं करणारी बोलकी कविता.त्यांची कविता बोलतच राहीली,सामजिक अभिरुचिचा धागा घेत वळणं बदलत राहिली. नजरेसमोर येत असलेया घट्ना त्यांना आतपर्यंत खेचत नेत आहे ते जाणवते परंतू ती धग आतच रुजून बसल्याचा भास होतो..काव्यरुपाने प्रखरतेनं ती किना-यावर येत नाही. विशाखेचा अखंड प्रवास सुरुच असताना रसिकांच्या वाढत्या काव्यक्षुधेला आता, पर्ण फ़ुले, निसर्ग, यापेक्षा वेगळे काहीसे हवे होते तेंव्हा त्यांना उत्तर देताना कुसुमाग्रज म्हणतात.
मीही असे जीर्णाचा वैरी, परि कालाच्या अतीत आहे
अनाद्यन्त ही दौलत सारी, प्रमदेच्या मधु अधरावरचे
ललित लालसर ते आमंत्रण, चंद्र पुनेचा धरतीभवती
करितो जो स्वप्नांची गुंफ़ण
सौंदर्ये ही होतील जेंव्हा, नीरस आणि असुंदर सखया
त्याच क्षणी या संसारातिल, कविता अवघी जाईल विलया
लेखिका - सुरुचि नाईक [क्रमश:भाग -४ (मराठी माती)]
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.