LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
तांदुळजाचे सरदार बावणे घराणे

तांदुळजाचे सरदार बावणे घराणे

0.0/5 rating (0 votes)

छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात अनेक नामांकित घराण्यांनी आपली तलवार गाजवत स्वराज्याची सेवा बजावली. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहित असताना तो छत्रपती आणि पेशवे यांच्याभोवती केंद्रित झाल्याने अनेकविध सरदारांच्या पराक्रमाची गाथा समोर न आल्याने अनेक ऐतिहासिक घटना उपेक्षितच राहिल्या. त्यातच कुठल्याही माणसाला स्वत:च्या परिसराचा इतिहास अधिक आवडतो. त्यामुळे जागतिक इतिहास वाचताना काही अंशी कंटाळा येऊ शकतो. मात्र परिसराच्या अभ्यासाने त्याच्यात इतिहासाची गोडी निर्माण होऊ शकते. त्यानुसार आपल्या परिसरातील मराठ्यांचे नामांकित सरदार नाईक बावणे घराणे इतिहासकारांच्या लेखणीतून का सुटले? हे समजत नाही.

प्रत्येक माणसाच्या चरित्राबरोबरच त्याच्या नावालाही काही इतिहास असतो. त्यामुळे बावणे हे नावही महाराष्ट्रात अन्यत्र कुठे आढळत नसल्याने नवीन माणसाला ते नावीन्यपूर्ण वाटते. परंतु बावणे घराण्याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर या शब्दातही मोठा इतिहास भरलेला आहे. मध्ययुगीन कालखंडात हिंदुस्थानातील एक लढवय्ये घराणे म्हणून या घराण्याची ख्याती असून अगदी जयपूरचा राजा मिर्झा राजे जयसिंगामार्फत हरिद्वारचे रागरवंशीय घराणे मोगल बादशहा जहांगिरच्या चाकरीत गेले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी अगदी थोड्याच कालावधीत नाम कमावले. त्यामुळे जहांगिरने त्यांना राव हा किताब दिला. पुढे दिवसेंदिवस या घराण्याच्या पराक्रमाची चढती कमान होती. एकदा शहाजहानच्या काळात सगर अर्थात सूर्यवंशीय पुरुषाने ५२ दिवसांत ५२ किल्ले जिंकून आपला पराक्रम दाखविला तेव्हा शहाजहान बादशहा या घराण्यातील पराक्रमी सरदारावर खुश होऊन त्यांना नाव दिले ‘बावणे’ . या विषयीचा उल्लेख एका कवितेत पुढीलप्रमाणे आलेला आहे-

‘बावन किल्ले बावनी दिनी साहेजहान।
तब ते नाम प्रसिद्धी मे आयो सिंध सुजान।।’

साहजिकच पुढे त्यांना बावणे या नावाने ओळखले जाऊ लागले. कारकीर्द कुणाचीही असो बावणे घराण्याचा पराक्रम कधी थांबला नाही. साहजिकच त्यामुळे शहाजहानने सुजानराव, औरंगजेबाने नाईकराव तर बहादुरशहाने बावणे सरदारांना निशानजेब किताब देऊन सन्मानित केले आहे. अशारीतीने १६ व्या शतकापासून हे घराणे क्षत्रियत्वाचे पालन करत असून मिर्झाराजे जयसिंहाच्या सोबत प्रथमत: महाराष्ट्रात आले. पुढे औरंगजेबाने बावणे सरदाराला धारूर सरकारमधील पांगरी, पिरपिंपळगाव, मांग देऊळगाव, देवडी देऊळगाव, भाईखेड ही पाच गावे जहागिरीत दिली होती. पैकी आज जालना जिल्ह्यात असणा-या या पांगरीला बावणे पांगरी म्हटले जाते. मालोजी बावणे हे प्रथमत: या परिसरात स्थिरावले. नागरकोट (जि. कांगरा) हिमाचलप्रदेश येथील वज्रेश्वरीदेवी ही बावणेची मूळ कुलदेवता असून महाराष्ट्रात स्थानिक झाल्यानंतर बावणे घराणे वणीच्या सप्तशृंगीला आपले कुलदैवत मानायला लागले.

बावणे घराण्याचा इतिहास तसा जानोजीराव बावणे यांच्यापासून सुरू होतो. औरंगजेबाच्या निधनानंतर मालोजीचे पुत्र जानोजीराव हे सातारचे छत्रपती शाहू यांच्याकडे चाकरीस गेल्यानंतर छत्रपतींनी त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली आणि तांदुळजा (सध्या लातूर जिल्हा) ही दोन जहागिरीत दिल्याने बावणे घराण्यांनी या दोन्ही ठिकाणी मोठ्या, विस्तीर्ण गढ्या बांधल्या. मात्र पुढे मराठेशाहीची सेवा करीत असताना बावणे घराणे तांदुळजा या ठिकाणी स्थायिक झाले. आज दोन-चार ठिकाणी बावण्यांच्या गढ्या असल्या तरी तांदुळज्याची गढी ही फारच प्रशस्त आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असून गढीची तटभिंत एवढी मोठी आहे की त्या भिंतीवरून एक बैलगाडी सहज जाऊ शकेल.

चार बुरुजांनी सज्ज असणा-या गढीत दिवाणखान्यापासून घोड्याच्या पागा आणि हत्तीशाळा असल्याने बावणेंच्या वैभवाची साक्ष पटते. खरं तर बावणे सरदार पुढे मराठेशाहीचे आधार बनून राहिले. त्यातच व्यंकटराव नाईक बावणेची मुलगी गजराबाईचा विवाह अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंग भोसलेंशी झाला होता आणि फत्तेसिंग म्हणजे शिवरायांचे नातू शाहू महाराजांचे दत्तक किंवा मानसपुत्र असल्याने बावणे घराण्याचे वजन ध्यानात येऊ शकते. वैवाहिक संबंधांबरोबरच बावणे सरदार हे अक्कलकोट संस्थानच्या घोडदलाचे प्रमुख होते. त्यामुळे जानोजीराव, व्यंकटराव, जगजीवनराव, भगवंतराव यांनी तलवार गाजविली.

दिल्लीची मोगलशाही बुडाल्यानंतर मराठ्यांचा शत्रू म्हणजे हैदराबादचा निजाम असून त्याच्यासोबत मराठ्यांनी खर्डा, राक्षसभुवन, उदगीर यांसारख्या महत्त्वपूर्ण लढाया केल्या. या प्रत्येक लढाईत मराठ्यांनी बाजी मारली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लढाईत बावणे सरदारांनी आपला पराक्रम दाखविला. १७६० ला दिल्लीपलीकडे अहमदशहा अब्दाली येथून दिल्ली जिंकू पाहात होता. चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांकडे असल्याने दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर होती. त्याच वेळी इकडे निजाम कुरापती काढत होता. भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या फौजेला मराठ्यांनी उदगीर या ठिकाणी धूळ चारली.

याचे कारण म्हणजे बीड, धारूर, औसा या परिसरातून जाणा-या फौजेला जानोजीराव बावणेंनी रस्त्यातच गाठल्याने हा विजय सोपा झाला. शेवटी हैदराबादचा निजाम सलबतजंगाने शरणागती पत्करून मराठ्यांना ६० लक्षाचा मुलुख देऊन तह स्वीकारला. या वेळी हा तह तांदुळज्याच्या बावणेंच्या गढीत झाला तेव्हा सलाबतजंगाने तहाचा कोरा कागद सही करून जानोजीरावांकडे दिला. यावरून मराठी\r\nसत्तेत बावणेंचे महत्त्व ध्यानात येऊ शकते. राक्षसभुवन, खर्डा, गुर्रमकोंडा अशा अनेक लढायांत त्यांनी भाग घेऊन स्वराज्याची सेवा केली. तांदुळजा या ठिकाणी बावणेंचे वास्तव्य असल्याने या परिसराची जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या गढीपासून शेतापर्यंत सर्वकाही ऐतिहासिक आहे. निजामाबरोबरच्या युद्धात शत्रूची खंडीने शीर म्हणजे मुंडकी ज्या परिसरात पडली त्याला नाव आहे शिरखंडी, पाण्यासाठी बारव, घोड्यांना चरण्यासाठी मसला वगैरे गावची जमीन कुरणासाठी ठेवलेली होती.

बावणे घराणे तलवारीबरोबरच घोडे व इतर कलाकारीमध्ये फार पुढचे असून त्यांच्या वंशजाकडे अनेक रंगीत कलाकुसरीची चित्रे उपलब्ध असून त्यावेळच्या चित्राची किंमत दिली आहे. त्यामध्ये भाऊसाहेब व्यंकाराव बावणे हे घोड्यावर बसल्याचे चित्र एवढे रेखीव आहे की, त्या चित्राची किंमत ७०० रुपये तर निजामाच्या याच पद्धतीच्या चित्राची किंमत फक्त ४० रुपये सांगितली आहे. यावरून त्यांचा दर्जा ध्यानात येऊ शकतो.

तांदुळज्याचे नाईक बावणे घराणे ज्याप्रमाणे अक्कलकोट संस्थानात नातेसंबंधात बांधले होते त्यानुसार या घराण्याचे वैवाहिक संबंध उस्मानाबादच्या राजेनिंबाळकर घराण्याशीही जोडलेले होते. आजतागायत बावणे घराण्याचा विस्तृत इतिहास लिहिला गेला नाही. काही इतिहासाची जानकारमंडळी संबंधित घराण्याकडून अस्सल कागदपत्रे पाहून घेऊन जातात. त्याप्रमाणे बावणे घराण्यातील उपजिल्हाधिकारी राहिलेले कै. बापूसाहेबांकडून नांदेडच्या कानोले व औरंगाबादच्या देशमुखांनी अनेक अस्सल कागदपत्रे व इतर साहित्य हस्तगत केले. त्यात बावणे घराण्याच्या थोर पुरुषांची रंगीत चित्रे तसेच छत्रपती शाहू महाराजांसह इंग्रजांनी दिलेल्या सनदा होत्या. याचे एकत्रीकरण करून बावणे घराण्याचा समग्र इतिहासमांडल्यास छत्रपती घराण्याच्या मराठवाड्यातील हालचाली ध्यानात येऊ शकतील. विशेष म्हणजे मराठवाड्यात निजामांची प्रबळ सत्ता असताना तांदुळज्यासारख्या दुर्गम भागात वस्ती करून मराठ्यांची सेवा केली. त्यामुळे ते मराठवाड्यातील छत्रपती घराण्याचे सर्वांत मोठे सेनापती ठरतात.

स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांना सरदारांची गरज राहिली नसल्याने आर्थिक सुबत्तेमुळे संस्थानिक चर्चेत राहिले. मात्र ज्यांच्या जिवावर साम्राज्य उभे राहिले अशी सरदार घराणी पडद्याआड गेली. शिल्लक राहिल्या गढीच्या भिंती आणि पूर्वजांच्या आठवणी. मोकाट लोकशाहीमुळे रीतीरिवाज, मान-सन्मान गेला. त्यामुळे सर्वसामान्यापेक्षा जगणे कठीण झाले. परंतु ज्याच्या रक्तातच लढवय्या वृत्ती असते तिथं सहिष्णुता येते. त्यामुळे तांदुळजा, गिरवली, अक्कलकोट, बावणेपिंपरी अशा अनेक गावांत बावणे घराण्याने आपल्यापरीने लोकसेवा बजावली. १७६० ला नाईक बावणेंनी तांदुळज्याच्या गढीत को-या कागदावर तह करायला भाग पाडले.

पुढे १९४६ ला हैदराबाद मुक्तिसंग्रामात रझाकाराच्या विरोधात स्वा. सै. अण्णासाहेब बावणे यांनी मोठा लढा उभा केला होता. आज आपापल्यापरीने बावणे घराणे लोकशाहीप्रमाणे जगत असताना तांदुळजा येथील अण्णासाहेब स्वातंत्र्य सेनानी, जानोजीराव ऊर्फ बापूसाहेब उपजिल्हाधिकारी, जगदीशराव बावणे साखर कारखान्याचे संचालक बनले तर आहे त्यात समाधान मानत धर्मराज बापूसाहेब बावणे हे जीर्ण असलेल्या गढीत मोठ्या स्वाभिमानाने राहतात. लातूर-कळंब रस्त्यावर तांदुळज्यातून पुढे जाताना नाईक-बावणे घराण्याची गढी आहे त्या स्थितीत आपल्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे. बावणे घराण्यातील भगवंतरावांनी रचलेला श्लोक किती बोलका आहे-

बोले व्यंकट सर्ग पंचम असे सद्बुद्धि सद्भावने 
मालोजी मम तात ‘राव’ म्हणति नाईक त्या बावणे।।

--डॉ. सतीश कदम,  मोबा. ९४२२६ ५००४४

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • निरामया +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • 1
 • 2