स्वातंत्र्य विर सावरकर ह्या चित्रपटात दाखवली आहेत माणसं, हाडामासाची माणसं, ज्यांना आपला देश आणि देशबांधव परकीय
सत्तेचे दास होणं मान्य नाही. नम्रपणे, हात जोडून दास्यत्व नाकारणं एकदा शक्य होईल पण वारंवार हात जोडणं आपल्या दुर्बलपणाचं लक्षण मानलं जातं आणि त्याचा लाभ घेऊन शत्रू अधिकाधिक शक्तिशाली होत जातो. गुलामगिरीची सवय अंगवळणी पडण्यापूर्वीच शत्रूला त्याच्या सत्तेसकट उलथवून टाकण्यासाठी जे, जे करता येईल ते करावं ह्या विचारसरणीने प्रेरीत झालेली ही माणसं वेळप्रसंगी शत्रूच्या नजरेला नजर देत त्याच्या छाताडावर वार करतात किंवा शत्रू जिंकतोय असं दाखवून त्याला खेळवत, खेळवत संपवतात.
स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वदेशी ह्या विचारांनी भारलेली माणसं केवळ एका कुटुंबापुरती, एका घरापुरती मर्यादीत असूच शकत नाहीत. त्यांची उद्दिष्टं आभाळाएवढी मोठी असतात. अश्या वेडाने भारलेला माणूस रात्रंदिवस आपल्या आयुष्यातील क्षण न् क्षण केवळ आपल्या उद्दिष्टासाठी जगतो आणि मरतोही. असाच एक माणूस फार पूर्वी होऊन गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा देऊन आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांच्याही पूर्वी होऊन गेलेलं एक महान व्यक्तिमत्त्व आपल्याला माहित आहे, ज्यांना आपण भगवान श्रीकृष्ण म्हणून पुजतो.
श्रीकृष्णाने युद्धातून पळ काळला म्हणून त्याला रणछोडदास म्हणतात पण कालयवनाला युक्तीने संपविण्याऱ्या भगवान श्रीकृष्णांना त्याने काही फरक पडत नसतो. शहाजीराजांनी ‘माझा मुलगा तर बादशाहाचा नोकर आहे’ म्हटलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘माझ्या मुलाला तुमच्या दरबारी सरदार म्हणून ठेवा’ असं म्हटलं तर ते कच खाणं नसतं. ती असते कूटनीती. शत्रूला हवं ते दिल्यासारखं दाखवणं आणि योग्य वेळ येताच आपलं उद्दिष्ट साध्य करणं, ह्यासाठी साम-दाम-दंड-भेद सर्व काही वापरायचं असतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकं तेच केलं. हे आपलं भाग्य म्हटलं पाहिजे की सावरकरांसारखे कूटनीतीमध्ये कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले देशभक्त आपल्या देशात होऊन गेले.
कथा सर्वांना माहित आहे त्यामुळे सांगत नाही पण सावरकर नावाचं शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे हे रणदीपने त्याच्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. सावरकरांच्या मनात घोंघावणारं स्वातंत्र्याचं वादळ कसं असेल हे दाखविण्यात तो एकशे एक टक्के यशस्वी झाला आहे. त्याकरता त्याने घेतलेले कष्ट सर्वांना माहित आहेतच.
चित्रपटातील काही संवाद खुसखुशीत आहेत तर काही संवाद आपल्या विचार करायला भाग पाडतात. परकीय आक्रमणकर्ते आले तेव्हा मूठभर होते पण आपल्यातीलच काही लोकांनी क्षुद्र स्वार्थापायी त्यांचं लांगुलचालन करण्याला प्राधान्य दिलं. त्याचे दाहक परिणाम आजच्या पिढीलाही भोगावे लागत आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘राष्ट्र प्रथम’ म्हणजे काय आणि ज्यांना सावरकरांबद्दल अत्यंत त्रोटक किंवा अर्धवट माहिती आहे ते सावरकरांची पुस्तके, त्यांच्यावरील लेख वाचून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न अवश्य करतील. इतिहासाचा अभ्यास करताना फक्त एकाच पुस्तकाचा करायचा नसतो. विविध समकालिन घटनांचा एकमेकांशी काय संबंध असेल ह्याचंही विश्लेषण करायचं असतं.
समुद्रातून ओंजळभर पाणी बाहेर काढलं तरी उरतो तो समुद्रच. धगधगत्या अग्निकुंडातून थोडा अग्नि काढून घेतला तरी उरतो तो अग्निच. कदाचित म्हणूनच रणदीप हुड्डाने त्याच्या एका मुलखतीमध्ये म्हटलं असावं की हे व्यक्तिमत्व तीन तासांच्या चित्रपटात बद्ध करणं शक्य नाही; कदाचित मालिका ह्याला न्याय देऊ शकली असती.
चित्रपटात काही उणीवा आढळल्याच तर त्या चित्रपटाची लांबी आणि बजेटचा विचार केल्यामुळे आल्या असाव्यात असं वाटतं. काही प्रसंग डॉक्युमेंटरी किंवा नाटकात सादर केले जातात तसे आहेत पण तरीही चित्रपटाच्या कथेवर त्याचा परिणाम होत नाही. खटकलेली बाब एकच, ती म्हणजे उपशिर्षके. इंग्रजांचे इंग्लिश संवाद हिंदी उपशिर्षकांमधे देण्यापेक्षा इंग्लिश ऑडिओ कमी करून भारतीय भाषांमधून डबिंग दिलं असतं तर जास्त प्रभावी ठरलं असतं असं वाटतं.
झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं अशक्य असतं पण तरीही एकदा सांगेन की सावकरवादी असाल तर चित्रपट पहा आणि सावरकरवादी नसाल तरीही चित्रपट पहा.
चित्रपट पाहिला असेल तर ह्या चित्रपटाला IMDB, Google आणि Book My Show वर रेटिंग-रिव्ह्यू द्यायला विसरू नका.
-- कांचन करई
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान सर्वांना माहीत आहे. खऱ्या राष्ट्रवादी असण्यासोबतच त्यांनी भारतातील सामाजिक सुधारणांमध्येही सक्रिय रस घेतला. सावरकरांच्या जीवनावरील ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा मराठी आणि हिंदी चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हुतात्मा दिनानिमित्त जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्यांचा रंजक प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष मांडतो.
वीर सावरकरांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात या चित्रपटाचा मराठी आवृत्तीचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. यावेळी मुख्य भूमिकेत असलेला मुख्य अभिनेता रणदीप हुड्डासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, हा चित्रपट आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, अवाक फिल्म्स, रणदीप हुडा फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी प्रस्तुत केला आहे आणि झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश रहार आणि रणदीप हुड्डा यांनी निर्मिती केली आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. अंकिता लोखंडे या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नी माई सावरकर यांची भूमिका साकारत आहे
.