लेखक: सई परांजपे, दिग्दर्शक: सई परांजपे ;कलाकार: मंगेश कदम, लीना भागवत, मयूरेश खोले, अनुष्का गीते. 'इवलेसे रोप' हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.
मंगेश कदम (Mangesh Kadam) आणि लीना भागवत (Leena Bhagwat) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत
‘इवलेसे रोप’ (Eevlese Rop) छान डौलदार बहरावं यासाठी त्याला चांगलं खतपाणी घालावं लागतं. नात्याचंही तसंच असतं ते चांगलं बहरावं यासाठी प्रेमाचं आणि विश्वासाचं खतपाणी घालायचं असतं. मुरलेल्या नात्याची अशीच खुमासदार गोष्ट घेऊन लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) 13 वर्षांनी रंगभूमीवर आल्या आहेत.
रावेतकर प्रस्तुत, नाटकमंडळी प्रकाशित आणि खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई निर्मित, ‘इवलेसे रोप’ या नव्या नाटकाचा शुभारंभ 8 मार्चला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर कल्याण येथे होणार आहे. मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेते मंगेश कदम (Mangesh Kadam), अभिनेत्री लीना भागवत (Leena Bhagwat) यांच्यासोबत मयुरेश खोले, अनुष्का गिते, अक्षय भिसे यांच्या भूमिका नाटकात आहेत.
‘इवलेसे रोप’मध्ये काय पाहायला मिळणार?
नातं या शब्दाची जादूच वेगळी आहे. प्रत्येक नात्याची मजा ती उलगडण्यातच येते,पण जास्त आनंद ते नातं जपण्यात आणि आयुष्यभर निभावण्यात असते. मोजायला गेल्या तर कालांतराने नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नातं जेव्हा पिकतं तेव्हा अधिक गोड होतं या टॅगलाइनसह आलेल्या ‘इवलेसे रोप’ या नाटकात ‘माई’ आणि ‘बापू’ या नवऱ्या बायकोच्या नात्यातील विविध रंग पाहायला मिळणार आहेत.
सई परांजपे यांनी लेखन, दिग्दर्शन करत व्यावसायिक नाटके, बालरंगभूमी, चित्रपट, माहितीपट, लघुपट अशा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘स्पर्श’ तसेच ‘चष्मेबद्दूर’,‘कथा’,‘दिशा’, ‘पपिहा’, ‘साज’ यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि अनेक दर्जेदार नाटकं देणाऱ्या सई परांजपे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे सन्मान लाभले आहेत.
‘इवलेसे रोप'बद्दल सई परांजपे म्हणाल्या...
‘इवलेसे रोप' या आपल्या नव्या नाटकाबात बोलताना सई परांजपे सांगतात, ‘इवलेसे रोप' ची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक हे माध्यम मला अधिक योग्य वाटलं. कोणत्याही नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात या गोष्टींचा उहापोह या नाटकात गमतीदारपणे करण्यात आला आहे.
सई परांजपे यांनी ‘इवलेसे रोप' हे छान नाटक आम्हांला गिफ्ट केलं असून उत्तम संहिता असलेले हे नाटक आम्हाला करायला मिळालं याचा आनंद अभिनेते मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांनी व्यक्त केला. सई परांजपे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होताच याचं श्रेय सई मावशीला जातं कारण तिच्या मोठेपणाचं दडपण तिने आमच्यावर येऊ दिलं नाही.