‘झी मराठी’ने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांची घोषणा केली होती.

यानुसार या दोन्ही मालिकांच्या प्रक्षेपणाला आता सुरुवात झाली आहे. ‘पारु’ आणि ‘शिवा’मध्ये प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. यानंतर आता ‘झी मराठी’ लवकरच आणखी दोन नव्याकोऱ्या मालिका सुरू करणार आहे. या मालिकांचे प्रोमो आणि स्टारकास्ट याबाबत नुकतीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच ‘झी मराठी’वर सुरू होणार असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार असल्याचं नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे. याशिवाय राकेशसह ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या दोन मुख्य कलाकारांशिवाय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेत्री शर्मिला शिंदेची झलक पाहायला मिळाली. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत झळकेल असं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.