" "अगं मैत्रेयी, देवाला हात जोडलेस् का ?"" "सूटकेस कुठेय, चावी कुठे ठेवलीस ग ?"

आईची नुसती लगबग चालू होती... बाबा गंभीर होऊन पुन्हा पुन्हा माझ्याकडे पहात होते. " काळजी घे ग..सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेव " मी हसत् होते. किती सूचना या ? "एकटी पोर चाललीये साता समुद्रापलीकडं..काळजी वाटणार ना ग ..मी तर पाठवणारच नव्हते..ह्यांनी एक् ऐकले नाही.. बापल्येक दोघेही सारखेच. आई ने सुनावलेच." बाबांचे नेहमीप्रमाणे लक्ष नसते !

बाबांनी मला द. आफ्रिकेत त्यांच्या मित्राकडे पाठवण्यासंदर्भात मला विचारणा केली. मी ही अत्यानंदाने हो म्हणून टाकलं. बाबांनी माझ्यावर विश्वास टाकल्याने मला आकाश ठेंगणे झाले होते. एक मुलगा असतानाही मुलीवर अशी जबाबदारी टाकण्याचे धाडस माझे बाबाच करू शकतात. पण आई अगदी विरूद्ध होती. तिने जाईपर्यंत सहजासहजी परवानगी दिलेली नव्हती. खरेतर तिला विचारले असते तर तिने कुणालाच पाठवले नसते. आफ्रिकेबद्दलची तिची मते फारशी चांगली नव्हती. आफ्रिकेत केप टाऊनला बाबांच्या मित्राचा व्यवसाय आहे. मुंबई आणि केप टाऊन अशा दोन्ही ठिकाणी कार्यालये आहेत. व्यवसायाचे बारकावे माहीत करून घेण्यासाठी बाबांनी मला त्यांच्याकडे पाठवायचे ठरवले होते. मुलाच्या ऐवजी मुलीला पाठवणार म्हटल्यावर ते काकाही प्रभावित झाले होते. फोनवरच मला त्यांनी कसल्याही सवलतीची अपेक्षा ठेवू नकोस ही तंबी दिली होती. मलाही ते नकोच होते.

दरम्यान पसपोर्ट, व्हिसा सगळे सोपस्कार उरकत आले होते. व्हिसा मिळाल्यानंतर तर आईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. जाण्याचे वातावरण तयार झाले होते. खरं तर खूप वाईट वाटत होतं. आयुष्यात कधीही विमानात न बसलेली माझी आई आणि अर्थातच मी ही..एकदम इतक्या लांब जाणार म्हटल्यावर प्रचंड भावनिक उलथापालथ होणे साहजिकच होते. एकदा जायचे निश्चित झाल्यावर मात्र घरी एकच गडबड सुरू झाली. चकल्या , भाजण्या यांचा कार्यक्रम सुरू झाला. आई ऐकायला तयार नव्हती. तिला विमानात किती सामान नेता येते वगैरे सगळे सांगून पाहिले. बाबांबा माहीत होते आई ऐकणार नाही. माझे सामान मात्र वाढत गेले. कपडे, आवश्यक बाबी, पैसे, चेक्स, कागदपत्रे या जोडीला आईने तयार केलेले जिन्नस दोन बॆगात बसवोताना माझी मात्र दमझाक झाली. शेवटी केबिन लगेज मधे अगदीच मोजक्याच वस्तू ठेवून बाकिचे सर्व मोठ्या बॆगेत भरले.

संध्याकाळची फ्लाईट असली तरीही आम्ही सकाळी सकाळीच पुणे सोडले. कितीतरी वेळा असे आम्ही एकत्र मुंबईला गेलो असू.पण आज सर्व संदर्भच बदलले होते. गाडीत नेहमी होणारी अंताक्षरी आज शांत शांत होती. सकाळ्चे बोचरे वारे आज पिऊन घ्यावेसे वाटत होते. या भूमीवरचे हे वारे माझ्या अंगाखांद्याला स्पर्श करून जाऊदेत..मन सांगत होते. खिडकीतून बाहेरचा निसर्ग डोळे भरून साठवून घेत होते. उजाडायच्या सुमारास आम्ही द्रुतगती महामार्गावर् होतो. सकाळची कोवळी किरणे माझ्या चेह-यावर पडून् मला हसवायचा प्रयत्न करीत होती. पक्षांचा किलबिलाट जणू काही मला निरोप देत होता. मी ही डोळे किलकिले करून त्यांना टाटा करीत होते.. एकीकडे निसर्गाशी माझे संभाषण असे चालूच होते. दुसरीकडे आईशी बोलत होते. बंधूराज मात्र गप्प होते. त्याला दोन दिवसांपूर्वी रागावले होते..स्वारीची कळी काही खुलत नव्हती. कदाचित बोलण्यासाठी संधीची वाट पहात असावी स्वारी..

आईला सिद्धीविनायकाला जायचे होते. तिथल्या रांगांची माहिती असल्याने बाबा नकोच म्हणत होते. पण शेवटी आईचा एव्हढातरी हट्ट पुरा करावाच लागला. तिथून येऊनही भरपूर वेळ शिल्लक होता. ओबेरॊय शेरेटनच्या समोर समुदावर जाऊन आम्ही उभे राहिलो. जायची वेळ जवळ येत होती. मन उचंबळून येत होते.. जसजशा भावना गळ्यापर्यंत उसळी घेऊन दाटत होत्या तद्वतच् समुद्राच्या लाटाही किना-याल धडका मारून मला स्पर्शून जात होत्या.. याच्याशी माझे विशेष नाते आहे..काय सांगतोस रे बाबा ? मी त्या दर्याला विचारले. जणू काही दोन ठिकाणांना जोडणारा दुवा आहे मी असेच तो सांगत असावा. मला त्याचा खूप आधार वाटला. क्षितिजाकडे एकटक पाहतांना अचानक क्षितिज वर उचलले जात असल्याचा भास झाला. डोक्यावरचा तो चैतन्यगोळा जणू स्थिर होता आणि धरणी त्याच्याकडे मान वर करून कलतेय असेच वाटले क्षणभर..आज मी तुला अंतर देणार नाही..भास्कराला मी म्हटले. विमानतळावर पोह्चोहलो तेव्हां तीन तास शिल्लक होते. आताच सुरक्षा तपासणी पूर्ण करून घ्यावी या उद्देशाने बाबांनी घाई करायला सुरूवात केली. खरेतर माझे पाय जड झाले होते... मन भरून येत होते. आईच्या खांद्यावर डोके ठेवून रडावे असे वाटत होते. अचानक खांद्यावर हात पडला..माझा लहान भाऊ होता. काही न बोलता त्याने मला मिठी मारली. काही बोलायची आवश्यकताच नव्हती. डोळ्यातून वाहणारे अश्रूच सगळे बोलून गेले. आई पदराला डोळे पुसत होती. तिच्या खांद्यावर डोके ठेवायची हौस भागवून घेतली. ही सुरक्षित आणि हक्काची जागा सोडून मी लांब चालले होते. अज्ञात अशा प्रवासाला निघाले होते..! बाबांच्या पाया पडतांना त्यांच्या गळ्यातून निघालेला तो जडभरल्या आवाजातला आशिर्वाद मला एकदम बालपणीच्या हक्काच्या जगात घेऊन गेला. एका क्षणात कितीतरी वर्षे पाठीमागे जाऊन मी बाबा म्हणून हंबरडा कधी फोडला मलाही कळाले नाही.. "बाई ग..या वर्षी तुझ्याशिवाय गौरी-गणपती.. दसरा......" आईला पुढे बोलवेना ! बाबांनी तिला थोपटले.. "आपली पोर सीमोल्लंघनाला निघालीय...या वर्षी विजयादशमी जोरात करायची आपण. " कुणीच काही बोलले नाही. घामट झालेल्या अंगाला वाराही शिवत नव्हता. तोही कुठतरी आळसावल्यासारखा पडून राहिला होता.. आणि आमच्या उड्डाणाची उद्घोषणा झाली. मनाचा हिय्या करून आणि संगमरवरी पुतळा होत चाललेल्या पायांना बळेच ओढत मी सुरक्षासीमा उल्लंघून मागे पहात हात हलवत् राहिले. डोळ्यात प्राण आणून मागे पहात मी चालले होते. आईबाबांना पुढे येऊ दिले जात नव्हते. कॆमेरा बॆगेत असला तरीही हा क्षण माझ्या मनात खूप खोलवर कोरला गेलाय. टाचा उंच करून काचेतून पाहणारी आई आणि अखेरच्या क्षणी डोळ्याला हात लावलेले बाबा !! आज केपटाऊन मध्ये केप ओफ गूड् होप्सच्या या प्रसिद्ध स्थळी बसून समुद्राकडे पाहताना हा चित्रपट डोळ्यासमोर पुन्हापुन्हा जसाच्या तसा तरंगून जातो. इथे म्हणे दोन समुद्र एकमेकांना मिळतात. निळ्या आणि हिरव्या पाण्याचा संगम इथे होतो असे म्हटले जाते.

काहींना मात्र तसा फरक कधीच दिसत नाही. कसा दिसणार ? निळ्या पाण्याच्या समुद्राचे नाव हिंदी महासागर आहे म्हणताना त्यांना काहीच फरक पडत नाही. मला मात्र ती जलरेषा स्पष्ट समोर दिसते. दोन्ही रंगही वेगवेगळे स्पष्ट दिसतात. इथे सुटीच्या दिवशी येऊन समुद्राकडे पाहतांना किती अश्वस्त वाटतं. मरीनडाईव्हला तो मला काय सांगत होता हे आता चांगलेच कळाले होते. माझ्या मातॄभूमीच्या लाटा तो इथे माझ्यासाठी घेऊन येत होता.. इतक्या उंचावरूनही त्या लाटांचा स्पर्श मला जाणवत होता... माघारी जाणा-या लाटांना स्पर्शण्यासाठी माझा हात नकळतच पुढे होतो.. मी परत् येतेय्...हा निरोप सांगण्यासाठी आजही मोबाईलपेक्षा मला त्यांचाच आधार जास्त वाटतो...!! या विजयादशमीला दोन्ही सीमांना जोडणारा खा-या पाण्याचा हा दर्या बाबांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंची आठवण करून देतांना वा-यासोबत त्यांचे शब्द माझ्यासाठी घेऊन येतो.. "आपली पोर सीमोल्लंघनाला निघालीय...या वर्षी विजयादशमी जोरात करायची आपण. " टचकन डोळ्यात तरारलेल्या थेंबांना मोकळी वाट देत मी तिथून उठते. मावळतीच्या किरणांचा खेळ सुरू झालेला असतो एव्हाना. आता क्षितिजाकडे पाहतानाही धरणी वर येताना दिसत नाही. दिसतो तो पाण्यात डुंबणारा तांबूस गोळा.. गळ्यात दाटलेला हुंदका घेऊन मी पुन्हा माघारी फिरते..दिवस मोजत !

मैत्रेयी भागवत

केप टाऊन

१७ सप्टेंबर २००९.