चिमुच्या पती ने तिला लिहिलेल्या पत्रातील एक अंश "आणि तू? तुझ्या त्या कातकरणी सारख्या झिप-या, आई आदिमायेसारखे कुंकू,
कोकणातल्या भटणीसारखे नेसणे, खो खो करून पुरुषासारखे हसणे; या तुझ्या गुणांनी माझे चित्त बांधले जाईल (गुण शब्दावर श्लेष आहे) असे तुला का वाटते? ज्याप्रमाणे नेपोलियनच्या कोशात 'अशक्य' हा शब्द सापडणे अशक्य होते, त्याप्रमाणे कटाक्ष, मंदस्मित, गजगती हे शब्द तुझ्या कोशात सापडणे मला अशक्य वाटते. हरिणीचे कटाक्ष न स्वीकारता त्यांच्या द्रुत उड्या तू मिळवल्या आहेस आणि हत्तिणीच्या गती ऐवजी तिच्या बारीक डोळ्यातला जडपणा तुझ्या वाट्याला आला आहे. हे असले रत्न माझ्या सारख्या ध्येयवाद्याला काय उपयोगी? माझी 'पंकभवा' ही हृदयस्पर्शी, मर्मछेदी, भावना हळवी लघुकथा तुला मोठ्या हौसेने वाचून दाखवू लागलो तेंव्हा तीतील उत्कट करुणरसाने डोळ्यातून पाणी काढण्या ऐवजी तू आपले जाम्बुवंती दात काढून हसलीस! तर माझ्या मानवी स्वभावाचे मार्मिक निरीक्षण ग्रथित करुण लिहिलेल्या नाट्यछटांचे मर्म तुला कसे आकलन होणार म्हणजे कळणार? मानवी व्यक्तीच्या भावनांचे, आचार विचारांचे व व्यवहाराचे सूक्ष्म धागे कुशल विणकऱ्याने गुंफून मानस शास्त्र विषयक कथानके रचण्याची महत्वाकांक्षा धरणा-या महाराष्ट्राच्या भावी कादंबरीकाराला तुझ्यासारख्या रुक्ष अनरोमांटिक 'ठकी' बरोबर जीवनयात्रा कंठावीसे वाटणे शक्य आहे काय? "
चिमणरावांचे च-हाट - चिं. वि. जोशी