एखादा दर्जेदार सिनेमा बघतोय की काय एवढ्या ताकदीने लिहिलेली कादंबरी म्हणजेच एक भाकर तीन चुली... 

लेखक - देवा झिंजाड, न्यू  इरा पब्लिकेशन्स , पुणे / किंमत - ४५० रुपये, प्रस्तावना : प्राच्यविदयापंडित डॉ आ.ह. साळुंखे/ पहिली आवृत्ती - २४ डिसेंबर २०२३/ दुसरी आवृत्ती - २२ जानेवारी २०२४/ तिसरी आवृत्ती - १९ फेब्रुवारी २०२४ मो नंबर : ९८९०६९७०९८
मराठी साहित्यिक क्षेत्रातला तळपता तारा अन्  सगळं उलथवून टाकलं पाहिजे ह्या वादळी कविता संग्रहाचे कवी अन् लेखणीच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा लेखक देवा झिंजाड सर
यांच्या लेखणीस सर्वप्रथम सलाम !!! नुकतीच सरांची प्रकाशित झालेली व प्रत्येक १५ दिवसाला एक आवृत्ती निघत आहे अशी, एक भाकर तीन चुली नावाची कांदबरी सर्वत्र गाजत आहे. ग्रामीण , जीवन , त्यातील स्त्रीचे भावविश्व रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकांनी अतिशय ताकदीने केला आहे. अलीकडच्या काळात एवढ्या ताकदीची कादंबरी वाचायला मिळालीच नव्हती. ती वाचली अन् भरून पावलो. मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरणारी कांदबरी म्हणजे एक भाकर तीन चुली असून देवा सरांनी या कांदबरीत सुमारे ३१ प्रकरणांतून स्त्रीचा संघर्ष मांडलेला दिसतो. संघर्ष म्हणजे स्त्री असा अर्थ संपूर्ण कांदबरीतून आपणास मिळतो.
पारू , मंजुळा , अन्साबाई , येवले मावशी ही पात्र जिवंत असल्यासारखी वाटतात अगदी चित्रपटाचा प्रमाणे वाचकांस भुरळ पाडतात स्त्रीचे आयुष्य - संघर्ष , होरपळ , तगमग , परवड , दैन्य दारिद्रय , शोषण , व्यथा आणि
कथा म्हणजेच " एक भाकर तीन चुली " होय . कादंबरीची ही भाषा सेंद्रिय , ग्रामीण देहबोली अस्सल रांगडीपणा , ग्रामीण भवताल हे सर्व उभं करताना लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. रा .र. बोराडे , रंगनाथ पठारे , शंकर पाटील , अण्णाभाऊ साठे , आनंद यादव ते आसाराम लोमटे , नवनाथ गोरे अन् आता देवा झिंजाड ह्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल इतका दर्जेदारपणा ह्या कादंबरीत आहे.
कवितेनंतरचा त्यांचा हा कांदबरी प्रवास अचंबित करणारा ठरतो .....यातील कथा, पटकथा , संवाद, पात्र ही सर्वच दृष्टिने कांदबरीला अत्युच्च शिखरावर घेऊन गेलेली आहेत.स्त्रीचे जीवन एखादया नदीप्रमाणे असते.
नदी ज्या पध्दतीने संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी वाहते, झिजते, जगते अन् अखेर तिचा प्रवास सागराला जाऊन संपतो. अगदी तसंच, " नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत बाळहंबरापासून ते हंबरडयापर्यंत, ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास संघर्षमय झाला अशा जगातल्या स्त्रियांना व आपल्या आईस कांदबरी लेखकांनी समर्पित केलेली दिसून येते.
" पोचल्याव कागुद पाहून दे बरका बाळा न्हायतं मप्ला जीव पाकुळीवानी वाट पाहीन ....पोटात शिरून रहा , लई शिक मोठा हो ..... "हा शेवटचा संवाद काळीज पिळवटून टाकणारा वाटतो .....
अशी ही नितांत सुन्दर कांदबरी सर्वांनी अवश्य वाचावी ही विनंती करून शब्दप्रपंच थांबवितो. देवा झिंजाड यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद !
आपलाच हितचिंतक
प्रा .पी .एस बनसोडे सर
लातूर ८३९०३६३२६५ / ९६०४३५४१४८