धुऊन आलेले कपडे प्रत्येकाच्या बेडरुममध्ये मी ठेवत होते ,तेव्हा मला माझ्या तेरा वर्षाच्या बहिणीची रोजनिशी अचानक दृष्टीस पडली.

मी माझ्या लहान बहिणीचा नेहमी मत्सर करत असे. माझी नेहमी तिच्याशी सुप्त स्पर्धा असे आणि तिच्या नैसर्गिक कुवतीबद्दल मला तिचा हेवा वाटत असे.तिची सावली माझ्या यशानं पुसून टाकण्याची माझी सततची धडपड असे. त्यामुळे आमच्यात क्वचित संवाद होतअसे.

ती रोजनिशी मी जमिनीवरून हळूच उचलली.त्यात माझ्याविरूद्धचे कट आणि दोषारोप मला दिसतील याची मला खात्रीच वाटत होती ; पण माझ्या अपेक्षेपेक्षाही ती धक्कादायक निघाली ! मी तिचा आदर्श होते .माझं व्यक्तिमत्व ,मी मिळवलेलं यश आणि विनोदाची गोष्ट म्हणजे माझी 'सचोटी' तिला कौतुकास्पद वाटत होती .तिला माझ्यासारखं बनायचं होतं.मी पुढे वाचणं बंद केलं.माझ्या हातून घडलेला अपराध मला जिव्हारी लागला होता.मी तिला दूर सारण्यात माझी इतकी शक्ती वाया घालवली होती की मी तिला ओळखूच शकले नव्हते.


तिची नव्यानं ओळख करून घेण्याची उर्मी माझ्या अंतःकरणात उफाळून आली.तिच्यापासून अंतर राखून ठेवायला मला प्रवृत्त करणारी माझी क्षुद्र असुरक्षितता अखेरीस बाजूला सारण्यात मी यश मिळवलं होतं.त्या निर्णायक दुपारी मी तिच्यापाशी जायचं ठरवलं.कोणताही न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे,तर तिच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी ! भांडण्यासाठी नव्हे,तर तिला कवेत घेण्यासाठी ! सरतेशेवटी ती माझी बहिण होती !

चिकन सूप फॉर द सोल - एलिशा एम.वेबस्टर